पिंपरी : महापालिका यंदा विक्रमी तीन लाख झाडे लावणार | पुढारी

पिंपरी : महापालिका यंदा विक्रमी तीन लाख झाडे लावणार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेच्या वतीने यावर्षी तब्बल 3 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. शहरात तसेच, शहराच्या कडेने असलेल्या जागेमध्ये विशेष मोहीम राबवून वृक्षारोपण केले जात आहे. निगडीजवळील रेड झोनमधील मोकळ्या जागेच्या कडेने 11 किलोमीटरच्या परिघात 1 लाख देशी वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे, असे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी गुरुवारी (दि.4) सांगितले. पालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड मिलिटरी स्टेशन व पुणे वन प्रकल्प विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निगडी येथील लष्करी जागेत वृक्ष लागवड मोहीम घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

आयुक्त पाटील म्हणाले की, 350 प्रजातींमधील देशी झाडांचे रोपण केले जात आहे. या मोहिमेत नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी वनप्रकल्पाचे विभागीय व्यवस्थापक सारिका जगताप, बोर्डचे अध्यक्ष तथा स्टेशन कमांडंट बि—गेडियर अमन कटोच, मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, देहूरोड स्टेशन अ‍ॅडम कमांडंट कर्नल एन. चितिरन, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव जाधव, उपायुक्त सुभाष इंगळे, उद्यान अधीक्षक जी. आर. गोसावी, सहायक उद्यान अधीक्षक मंजूषा हिंगे आदी उपस्थित होते.

शहरात हरित क्षेत्र गरजेचे
रेड झोनमुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेवरील काही जागा मोकळी आहे. तेथे बांधकाम होऊ शकत नाही. त्या ठिकाणी हरित क्षेत्र तयार करणे शक्य आहे. झाडे लावणे सोपे असते. मात्र त्यांचे जतन व संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने एक तरी झाड लावावे, असे आवाहन स्टेशन कमांडंट बि—गेडियर अमन कटोच यांनी केले.

Back to top button