सोमेश्वरनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा | पुढारी

सोमेश्वरनगरला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: बारामतीच्या पश्चिम भागाला बुधवारी (दि.3) मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. सायंकाळी सातच्या सुमारास सुरू झालेला पाऊस कमी- अधिक प्रमाणात रात्री अकरापर्यंत सुरू होता. चालू पावसाळ्यातील सर्वाधिक पावसाची नोंद बुधवारी झाली. यामुळे परीसरातील सर्वच ओढे, नाले, विहिरी, तलाव तुडुंब झाले आहेत. मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. शनिवारीच या भागात पावसाने हजेरी लावली होती. यानंतर तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी तब्बल चार तास जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे उसाच्या सरीत पाणी साठले होते. अनेक शेतकर्‍यांनी सकाळी ते पाणी बाहेर काढले.

बुधवारी सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवत होता. उकाड्याने हैराण झालेल्या शेतकर्‍यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. पाऊस येण्याची शक्यता असल्याने शेतकर्‍यांची कामे उरकण्याकडे कल होता. चांगला पाऊस झाल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. या पावसाचा खरीपातील पिकांना चांगलाच फायदा होणार आहे. पावसामुळे शेतात ठिकठिकाणी पाणी साठले होते.

जून कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात संततधार पाऊस पडला होता. मात्र, मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांना श्रावणातील पावसामुळे दिलासा मिळाला आहे. सोमेश्वर कारखाना परिसरासह, मुरुम, वाघळवाडी, वाणेवाडी, निंबुत, करंजेपूल, करंजे, सोरटेवाडी, होळ, सोमेश्वर मंदीर परीसराला पावसाने झोडपून काढले. साळोबावस्ती, सोरटेवाडी, करंजे येथील ओढे पावसामुळे वाहू लागले आहेत.

Back to top button