पुणे : रंगीबेरंगी फ्रेंडशीप बँड, ग्रीटिंगची चलती; मैत्रीदिनानिमित्त बाजार सजला | पुढारी

पुणे : रंगीबेरंगी फ्रेंडशीप बँड, ग्रीटिंगची चलती; मैत्रीदिनानिमित्त बाजार सजला

पुणे; पुढारी वृत्तसेवा: मैत्री म्हणजे आपुलकी अन् मैत्री म्हणजे एकमेकांची साथ… अशा मैत्रीपूर्ण भावनांना शब्दरूप देणारी शुभेच्छापत्रांसह रंगीबेरंगी रिबिन्स, ब्रेसलेट अन् फ्रेंडशीप बँडने दुकाने सजली आहेत. जोडीला मैत्रीच्या बंधाला घट्ट धाग्यात बांधणार्‍या भेटवस्तूंनी दालने सजली असून, मैत्री दिन जवळ आल्याने फ्रेंडशीप बॅण्डपासून ते शुभेच्छापत्रांपर्यंतच्या वस्तूंनी दालनांचे रूप पालटले आहे. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, डेक्कन परिसर, जंगली महाराज रस्ता, कॅम्प आणि रविवार पेठेत अशा वस्तू उपलब्ध असून, सोशल मीडियाच्या जमान्यात मैत्रीचे नाते उलगडणार्‍या शुभेच्छापत्रांना तरुणांची पसंती आहे.

रविवारी (दि.7) सगळीकडे मैत्री दिन साजरा होणार आहे. यानिमित्ताने हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेतील शुभेच्छापत्रे दालनांमध्ये उपलब्ध आहेत. हॅपी फ्रेंडशीप डे, तूच माझा मित्र तूच सखा, आपल्या मैत्रीचा प्रवास असाच सुरू राहो… अशा विविध संदेशांसह काही म्युझिकल शुभेच्छापत्रेही लक्ष वेधून घेत आहेत. तर विविध रंगातील फ्रेंडशीप रिबिन्स, ब्रेसलेट उपलब्ध आहेत.

फोटोफ्रेम, प्रिंटेड मग, की-चेन, वॉल हॅगिंग, फ्रेंडशीप वॉच अशा वेगवेगळ्या वस्तूही पाहायला मिळतील. पण, यंदा फ्रेंडशीप रिबिन्सला कमी मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. वेगवेगळ्या प्रकारातील बॅण्ड उपलब्ध आहेत, त्याला चांगली मागणी आहे. पण, यंदा फ्रेंडशीप रिबिन्सला खूप कमी मागणी आहे. ब्रेसलेट आणि बॅण्डला प्रतिसाद आहे. त्यामध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत, असे व्यावसायिक शरद कदम यांनी सांगितले.

फिरायला जाण्याचे नियोजन
मैत्री दिनाच्या निमित्ताने यंदा तरुणाईने मित्रांबरोबर फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. मुळशी, लोणावळा, भोर, महाबळेश्वर, पाचगणी आदी ठिकाणी मैत्रीदिन सेलिब्रेट करण्याचे निमित्त तरुणाईने आखले आहेत. त्यासाठी अनेकांनी अ‍ॅडव्हान्स हॉटेल्स अन् रेस्टॉरंटचे बुकिंगही केले आहे. मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर अनेकजण फिरायला जाणार आहेत.

 

Back to top button