पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद दृष्टिशोध अभियान; मोफत चष्मे, आवश्यक संदर्भसेवा | पुढारी

पुणे : शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद दृष्टिशोध अभियान; मोफत चष्मे, आवश्यक संदर्भसेवा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या (6 ते 18 वयोगट) विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषद दृष्टिशोध अभियान राबवत आहे. हे अभियान पूर्ण ऑगस्ट महिन्यात सुरू राहणार असून, त्याअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत चष्मे आणि आवश्यक संदर्भसेवा दिली जाणार आहे,’ अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 5 हजार 550 शाळांतील मुलांची यापूर्वी असलेल्या आजारांची, वारंवार आजारी असल्यामुळे गैरहजर राहणारे विद्यार्थी, तसेच वारंवार आरोग्यविषयक तक्रार करणार्‍या विद्यार्थ्यांची वर्गशिक्षकांकडून माहिती घेऊन विशेषतः दृष्टिदोष असणार्‍या व इतर आजारांबाबत तपासणी करण्यात येणार आहे.

या अभियानासाठी विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अधिकृत शाळेतील असणे बंधनकारक आहे. दरम्यान, शालेय तपासणीअंती दृष्टिदोष आढळलेल्या मुलांची नेत्रचिकित्सकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. व्हिजन पुणे मोहिमेमधील दृष्टिदोष आढळलेल्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत. ग्रामीण क्षेत्रात आरोग्य विभागाकडून जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यामार्फत आरबीएसके कार्यक्रमांतर्गत शालेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी जिल्ह्यात 73 पथके कार्यरत असून, एका पथकामध्ये एक पुरुष वैद्यकीय अधिकारी, एक महिला वैद्यकीय अधिकारी, एएनएम व औषधनिर्माण अधिकारी समाविष्ट आहे. अंगणवाडी स्तरावरील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते आणि शालेय स्तरावरील मुलांची तपासणी वर्षातून एकदा करण्यात येते.

Back to top button