पुणे : ग्रामीण-शहरी मुलांत संवाद वाढावा; अनिकेत प्रकाश आमटे यांचे मत | पुढारी

पुणे : ग्रामीण-शहरी मुलांत संवाद वाढावा; अनिकेत प्रकाश आमटे यांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा: ‘शहरी भागातील मुलांना सभोवतालच्या वातावरणाविषयी विचार करायला भाग पाडण्यासाठी त्यांचा ग्रामीण मुलांबरोबर संवाद वाढविण्याचे प्रयत्न व्हायला पाहिजेत,’ असे मत सामाजिक कार्यकर्ते अनिकेत प्रकाश आमटे यांनी व्यक्त केले.
लायन्सच्या वतीने अनिकेत आमटे यांना लायन्स सेवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. क्लबचे सेक्रेटरी नीलेश कुलकर्णी, खजिनदार संजय मुनोत, डॉ. अनिल तोष्णीवाल, डॉ. ज्योती तोष्णीवाल यांसह मान्यवर उपस्थित होते.

आमटे म्हणाले, ‘हेमलकसा, आनंदवन या भागांत प्रकाश आमटे यांच्या परिश्रमातून अनेक सामाजिक कामे करण्यात आली. सध्या ते आजाराशी लढत आहेत. ते लवकरच बरे होतील. गेल्या वीस वर्षांपासून मीसुद्धा माझ्या परीने समाजकार्यात योगदान देत आहे. मात्र, वीस वर्षांपूर्वी सुरू केलेल्या शाळांमध्ये शिकून मोठी झालेली मुले सध्या विविध क्षेत्रांत कामगिरी करत आहेत.

हे यश बघण्यासाठी संयमाची आवश्यकता असते. हेमलकसासारख्या दुर्गम भागातील मुलांना पायाभूत शैक्षणिक सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे शहरी भागातील पालक समानतेच्या गप्पा मारतात. मात्र, प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येते तेव्हा आपल्या मुलांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये पाठवतात. मुलांना महागडे मोबाईल घेऊन देतात.’

Back to top button