पुणे : वकिलाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल | पुढारी

पुणे : वकिलाला मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हॉटेलमधील जेवणाच्या कारणातून वकील व त्याच्या मित्रांना मारहाण करत पिस्तूल रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कल्याणीनगरमध्ये एलरो पब, बी-3, सेरेब्रम आयटी पार्क येथे घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी हॉटेल मालक सुमीत चौधरी (वय 34), मॅनेजर संकेत सावंत (वय 35), प्रफुल्ल गोरे (वय 29), गुंड, बाउंसरच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत मनोज सतीश माने (वय 32, रा. हेवन पार्क) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने हे त्यांच्या मित्रासोबत एलरो पब येथे जेवणासाठी गेले होते. गेटवर जेवणाबद्दल तेथील सुरक्षा रक्षकाला विचारले असता, त्याने जेवण मिळणार नसल्याचे सांगितले. त्या वेळी माने यांनी हॉटेल मालक व इतरांना विचारले असता, त्यांनी संगनमत करून माने व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. तसेच माने यांच्यावर पिस्तूल रोखून पोलिसांना बोलावतो काय, असे म्हणून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार घडल्यानंतर माने यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दिला होता. दाखल अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button