पुणे : माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन | पुढारी

पुणे : माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन

चाकण : पुढारी वृत्तसेवा : आजवर ड्रोनचा उपयोग हा शूटिंग, शेतीशी संबंधित औषध फवारणी तसेच वस्तूंची देवाण-घेवाण करण्यासाठी होत होता. मात्र आता चक्क माणसाला घेऊन उडणारा भारतातील पहिला ड्रोन तयार झाला आहे. चाकण (ता. खेड, जि. पुणे) औद्योगिक वसाहतीमधील सागर डिफेन्स इंजिनिअरिंग कंपनीने हा ड्रोन तयार केला आहे.

चाकण एमआयडीसीमध्ये या ड्रोनची यशस्वी चाचणी झाली आहे. आता या ड्रोनने माणसाचे उड्डाण करता येणार आहे. यापूर्वी या ड्रोनची पहिली चाचणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घेण्यात आल्याचे या कंपनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

कंपनीच्या इंजिनिअर्संनी चार वर्षांच्या अथक मेहनतीतून हा ड्रोन तयार केला आहे. खास भारतीय सैन्य दलाच्या मदतीसाठी हा ड्रोन तयार करण्यात आला आहे. या ड्रोनची क्षमता 130 किलो वजन घेऊन उड्डाण करण्याची आहे. 130 किलो वजन घेऊन जाणारा ड्रोन सुरक्षेच्या द़ृष्टिकोनातून अत्यंत सक्षम आहे. या ड्रोनमुळे एका ठिकाणावरील वस्तू, माणूस दुसर्‍या ठिकाणी कमी वेळात आणि कमी खर्चात सहज घेऊन जाता येणार असल्याचे या कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

रुग्णांनाही मदत

एका ठिकाणावरील अवजड सामान या ड्रोनच्या साहाय्याने दुसर्‍या ठिकाणी ठेवता येईल. गरजेच्या एखाद्या रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठीदेखील या ड्रोनची मदत होऊ शकते. या ड्रोनची रेंज 25 कि. मी. आहे. याचा उड्डाण वेळ 25 ते 33 मिनिटे आहे. सागर डिफेन्सला नौदलाकडून हा प्रकल्प मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

शेतीसाठीही फायद्याचा

पेरणी क्षेत्राचे मोजमाप, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन, कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांच्या फवारणीसाठी ‘किसान ड्रोन’चा वापर केला जाणार आहे, अशी तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना नव्या तंत्रज्ञानाचा फायदा होईल. मोठ्या शेतकर्‍यांना हे तंत्रज्ञान परवडेल. बागायती पिकांवरील फवारण्यांमध्ये ड्रोनचा मोठा उपयोग होऊ शकतो.

Back to top button