नानगाव : ‘भीमे’चा पूर आता स्वप्नवतच; दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने चित्र | पुढारी

नानगाव : ‘भीमे’चा पूर आता स्वप्नवतच; दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने चित्र

राजेंद्र खोमणे

नानगाव : पावसाळा सुरू झाला की पूर्वी भीमेला चार ते पाच मोठमोठे पूर येत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने नदीपात्रात येणारे पूरही कमी होत असल्याचे चित्र आहे. वाढती वृक्षतोड आणि त्यामुळे होणारे शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून, मोठ्या प्रमाणावर सिमेंटची जंगले उभी होत आहेत. यामुळे निसर्गाच्या चक्रात सातत्याने बदल होत असून याचा परिणाम पावसावर झाला आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पुरांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. डोंगर भागात व जंगल परिसरातदेखील सध्या वृक्षतोड होत आहे. अशा ठिकाणी घरांची संख्या वाढत चालली आहे.

मानवाने निसर्गात केलेला हस्तक्षेपही पावसाच्या कमी होणार्‍या प्रमाणाला कारणीभूत आहे. पूर्वीचे पाऊस आणि सध्या सुरू असणारे पावसाचे दिवस यामध्ये खूपच फरक दिसून येत आहे. पूर्वी नद्यांना, ओढ्यांना व नाल्यांना मोठ्या प्रमाणावर पूर येत होते. पुरात मोठमोठी झाडे, कचरा वाहून जात होता. पुराचे पाणी गावात व शेतात शिरल्याने मोठे नुकसान होत होते. मात्र पूर्वीचे नद्यांना येणारे पूर आता फक्त स्वप्नातच दिसत असल्याचे जुने जाणकार बोलून दाखवतात.

जून व जुलै हे दोन महिने पावसाचे संपले असून अजून एकही पूर भीमेला आलेला नाही. निसर्गात होणारा बदल आणि दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस यामुळे भविष्यात पाण्याचे संकट उभे राहू शकते. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी कमी होताना दिसत आहे. त्यामुळे मनुष्याने निसर्गातील हस्तक्षेप थांबविला पाहिजे, असेही जाणकार बोलत आहेत.

 

Back to top button