बावडा परिसरात सोयाबीनचे पीक जोमात | पुढारी

बावडा परिसरात सोयाबीनचे पीक जोमात

बावडा; पुढारी वृत्तसेवा: चालू खरीप हंगामामध्ये बावडा (ता. इंदापूर) परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत सोयाबीन पिकाखालील क्षेत्रात वाढ झाल्याचे चित्र आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. पिकाची वाढ जोमात झाली आहे. सोयाबीन हे पीक द्विदल वर्गातील असून, या पिकामुळे जमिनीचा पोत मोठ्या प्रमाणावर सुधारतो. तसेच बाजारात सोयाबीनला वर्षभर चांगला दर मिळत असल्याने चालू वर्षी सोयाबीन पिकास शेतकर्‍यांनी पसंती दिल्याचे सोयाबीन उत्पादक शेतकरी प्रकाशराव जगताप, दिनकर गायकवाड (बावडा) यांनी दिली.

सोयाबीन हे पीक अवघ्या चार महिन्यांत येत असून सतत ऊस पीक घेणार्‍या शेतकर्‍यांना फेरपालटासाठी हे पीक अतिशय उत्कृष्ट ठरत आहे. सोयाबीन पिकावर येणार्‍या शेंगा पोखरणार्‍या अळीच्या बंदोबस्तासाठी एक-दोन वेळा कीटकनाशक औषधांची फवारणी करणे गरजेचे असते.

चालू खरिपात अनेक शेतकर्‍यांनी फळबागांमध्ये हे पीक आंतरपीक म्हणूनही घेतलेले दिसून येत आहे. बावडा परिसरात सरासरी 10 ते 12 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन यापूर्वी शेतकर्‍यांनी काढलेले आहे. सोयाबीनच्या जे. एस. – 335 या वाणाला शेतकर्‍यांची पसंती असल्याचे कृषीतज्ञ सुधीर पाटील (बावडा) व कृषी पदवीधर अमर भोसले (सराटी) यांनी सांगितले.

बावडा परिसरात फळबागेत घेतलेले सोयाबीनचे आंतरपीक.

Back to top button