इंदापूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

इंदापूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा: पावसाळ्यातील ऑगस्ट महिना उजाडला तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पावसाळ्यातील जून – जुलै हे दोन महिने उलटले तरी शेतातील उसाच्या सर्‍या भरून पाणी वाहिलेले नाही. जून – जुलै या दोन महिन्यांत काही प्रमाणात पाऊस झाला असून, या पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी भरून आलेली नाही. जून – जुलैमध्ये पाऊस झाल्यानंतर शेतकर्‍यांनी उसाच्या लागणी सुरू केल्या.

परंतु, जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी वेळेत पाऊस न झाल्याने उसाच्या पिकांमध्ये हुमणी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. यावर्षीही थोड्याफार प्रमाणात हुमणी किडीचा प्रादुर्भाव उसाच्या शेतामध्ये दिसत आहे.मोठा पाऊस झाल्यानंतर उसाच्या पिकातील किडींचा प्रादुर्भाव कमी होतो, असे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे.

त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या निरा डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने शेतकर्‍यांना पिकांना पाणी कमी पडलेले नाही. तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी टिकून राहिली आहे; परंतु जमिनीतील पाण्याची पातळी भरून येण्यासाठी शेतकर्‍यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.

Back to top button