बारामती : संततधार पावसाचा पिकांना फायदा | पुढारी

बारामती : संततधार पावसाचा पिकांना फायदा

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती शहर आणि तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे खरिपातील पिकांना फायदा झाला आहे. तालुक्यात पावसाने ओढ दिली होती. पण, गेल्या आठवड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. त्यामुळे स्थिती बदलली. जिरायती भागालाही पावसाने चांगली साथ दिली. सुपे व परिसरातील पिकांसाठी अजूनही मोठ्या पावसाची गरज आहे. दिवसभर ढगाळ वातावरण, मध्येच पडणार्‍या पावसाच्या सरी आणि सुरू असलेला ऊन-वार्‍याचा खेळ, असे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. संततधार पावसामुळे जनावरांच्या चार्‍याचा आणि वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे वीर धरणातून निरा नदीत पाणी सोडण्यात आले. पाऊस थांबल्याने विसर्ग बंद करण्यात आला. धरण जवळपास 97 टक्के भरले असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. तरीही दर वर्षी वाहणारे ओढे, नाले, तलाव कोरडेच असल्याने शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे, तर ग्रामीण भागातील काही गावांना पाऊस हुलकावणी देत आहे. खरिपातील पेरण्या पूर्ण झाल्या असून, बाजरी आणि सोयाबीन पिकांना पावसाचा फायदा होत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकरी शेतातील कामे उरकून घेत आहे. संततधार पावसामुळे शहरातील रस्ते निसरडे झाले असून, अनेक वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत.

Back to top button