बारामती : बंद पानटपरीतील नायलॉन मांजा जप्त

बारामती : शहरातील मुजावरवाडा येथे एका बंद पानटपरीत ठेवलेला धोकादायक नायलॉन मांजा बारामती शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. याप्रकरणी संदीप मनोज पाटील (वय 25, रा. मुजावरवाडा, बारामती) याला पोलिसांनी अटक केली. मुजावरवाडा येथे पाटील यांच्या घराशेजारी ही पानटपरी आहे. तेथे पाटील याने नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना मिळाली होती.
त्यानुसार, त्यांनी कर्मचार्यांना कारवाईचे आदेश दिले होते. पोलिस उपनिरीक्षक संध्या देशमुख, कर्मचारी तुषार चव्हाण, दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, मनोज कोठे, हवालदार शिंदे यांनी बुधवारी (दि. 3) तेथे जात छापा टाकला. या वेळी 18 हजार रुपये किंमतीचा 45 बंडल नायलॉन मांजा आढळून आला. पाटीलविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.
शहरात मांजाने अनेकांना इजा
धोकादायक नायलॉन मांजाचा वापर करत पतंगबाजी केल्याने शहरात मंगळवारी काहींना इजा झाली. त्यामुळे पोलिसांनी सतर्क होत अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. धोकादायक मांजा विक्रेत्यांबरोबरच आता असा मांजा लावून पतंग उडविणार्यांवर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले.