सांगवीचे रुग्णालय केवळ प्रसूतिगृहापुरते मर्यादित | पुढारी

सांगवीचे रुग्णालय केवळ प्रसूतिगृहापुरते मर्यादित

दीपेश सुराणा : 
पिंपरी : सांगवी येथील महापालिकेचे रुग्णालय हे सध्या केवळ प्रसूतिगृहापुरते मर्यादित आहे. येथे महिलांच्या प्रसूतीसाठी शस्त्रक्रिया, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया आदींची सुविधा आहे. विविध प्रकारच्या प्राथमिक उपचारासाठी बाह्यरुग्ण विभागाची सोय आहे. मात्र, अस्थिरोग व अन्य आजारांच्या शस्त्रक्रिया किंवा आंतररुग्ण विभागातील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करुन घेता येत नाही.

सांगवी येथील महापालिकेच्या रुग्णालयात 16 खाटांची सोय आहे. येथे दररोज 3 ते 4 महिलांच्या प्रसूती शस्त्रक्रिया करण्याची सुविधा आहे. येथील रुग्णालयात दापोडी, सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर आदी परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. परिसराची लोकवस्ती वाढलेली आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी 110 रुग्ण तपासण्यासाठी येतात.

त्यामुळे रुग्णालयावर अतिरिक्त ताण पडत आहे. रुग्णालयात सध्या सर्व प्रकारच्या प्राथमिक उपचारांची सोय आहे. त्यामध्ये बालरोगाशी संबंधित प्राथमिक उपचारांचाही समावेश आहे. गरोदर मातांना दररोज तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे. बाह्यरुग्ण विभागात दर बुधवारी आणि शनिवारी फिजिशियन डॉक्टर उपस्थित असतात. रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ, फिजिशियन आदी तज्ज्ञ डॉक्टर आहेत. मात्र, कान, नाक, घसा तज्ज्ञ व अन्य तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे.

सुविधांचा अभाव
महिलांची प्रसुती होत असताना लहान मुलांसाठी अतिदक्षता विभागाची सोय नाही.
रुग्णालयाला जाणवतेय जागेची कमतरता
अपघात झालेल्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची सोय नाही.
रुग्णालयात काही औषधे मिळत नसल्याने ती रुग्णांना बाहेरुन आणावी लागतात.
आजारांवर शस्त्रक्रियेची सोय नसल्याने रुग्णांना अन्य रुग्णालयांत जावे लागते.
दंतोपचार, जळित रुग्ण आदींबाबतही

सांगवी रुग्णालयात महिलांची प्रसूती शस्त्रक्रिया, कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया आदींची सोय उपलब्ध आहे. रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग आहे. मात्र, महिलांची प्रसूती वगळता विविध आजारांवरील उपचारासाठी आंतररुग्ण विभागात दाखल करुन घेण्याची सोय नाही. रुग्णालयासाठी अपुरी पडणारी जागा लक्षात घेता नवीन रुग्णालयाची मागणी केली आहे. त्यासाठी दोन ते तीन जागा सुचविल्या आहेत.
    – डॉ. तृप्ती सांगळे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, इंदिरा गांधी प्रसूतिगृह (सांगवी रुग्णालय)

 

रुग्णालयामध्ये माझ्या पत्नीला प्रसुतीसाठी दाखल केले आहे. येथे वैद्यकीय सुविधा व्यवस्थित आहे. काही औषधे बाहेरुन आणावी लागली. बाकी सर्व औषधे रुग्णालयात मिळाली. अपघात झालेल्या रुग्णांना प्राधान्याने रुग्णालयात दाखल करुन घेण्याची सुविधा द्यायला हवी. तसेच, अन्य आजारांवरील उपचाराच्या सुविधाही वाढवायला हव्या.
                                                         – विजय सूर्यवंशी, रुग्णाचे नातेवाईक.

Back to top button