वेल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा ठप्प | पुढारी

वेल्ह्यातील पशुवैद्यकीय सेवा ठप्प

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा: दुर्गम व अतिमागास समजल्या जाणार्‍या वेल्हे तालुक्यातील पशुवैद्यकीय सेवा ठप्प पडली आहे. वेल्हे, तोरणा राजगड, पानशेत भागातील पशुवैद्यकीय दवाखाने डॉक्टर, कर्मचार्‍यांअभावी बंद असल्याने आजारी जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. तोरणागडाच्या पश्चिमेला असलेल्या पासली येथील पशुवैद्यकीय दवाखाना अनेक दिवसांपासून बंदच आहे. केळद येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांचा बैल आजारी पडल्याने ते दवाखान्यात हेलपाटे मारत आहेत. मात्र, दवाखाना बंद असल्याने बैलाला उपचार मिळाले नाहीत.

केळद, भोर्डी, वतोती आदी गावांतील शेतकरी दूर अंतरावरून पायपीट करीत पासली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात येत आहेत. मात्र, दवाखाना बंद असल्याने जनावरांना औषध मिळत नाही. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद देशमाने यांच्यासह पासली, सोंडे माथना भागातील शेतकरी बुधवारी (दि.3) सकाळी अकरा वाजता वेल्हे येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेले. त्या वेळी केवळ एकच महिला कर्मचारी दवाखान्यात होती. डॉक्टर आले नव्हते.पानशेत धरण भागातील शिरकोली येथील पशुवैद्यकीय दवाखानाही अनेक दिवसांपासून उघडलेला नाही, अशी तक्रार स्थानिक शेतकर्‍यांनी केली. साखर, सोंडे सरपालेले आदी दवाखाने पशुधन पर्यवेक्षक, कर्मचारी नसल्याने बंद आहेत.

पुरेसे कर्मचारी नसल्याने एका कर्मचार्‍याला दोन दवाखान्याचा कार्यभार सांभाळावा लागत आहे. तालुक्यात पशुधन पर्यवेक्षकाची चार पदे , कर्मचार्‍यांची सहा पदे, तसेच पशुधन विकास विस्तार अशी पदे रिक्त आहेत. वेल्हे तालुका पंचायत समितीचे पशुवैद्यकीय विस्तार अधिकारी डॉ. संजय कनुंजे सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा कार्यभार वेल्हे पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. भास्कर धुमाळ हे पाहत आहेत. डॉ. धुमाळ म्हणाले, की बुधवारी सकाळी फिरतीवर असल्याने सकाळी दवाखान्यात येण्यास उशीर झाला. तालुक्यातील दोन पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक पदे रिक्त आहेत. उर्वरित दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक व कर्मचारी आहेत. ज्या दवाखान्यात कर्मचारी नाहीत त्यांना समज दिली जाणार आहे.

जनावरांचा मृत्यू, दवाखाने मात्र बंद
सध्या जोरदार पाऊस, साथीचे आजार आदी कारणांमुळे पावसाळ्यात जनावरे आजारी पडत आहेत. चांदर, खाणू येथे अतिवृष्टीने पन्नासहून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. असे असताना वेल्हे तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने कर्मचार्‍यांअभावी बंद असल्याचे गंभीर वास्तव्य पुढे आले आहे.

Back to top button