पिंपरी : ग्लासातील दारू सांडल्याने त्या तरुणाचा खून | पुढारी

पिंपरी : ग्लासातील दारू सांडल्याने त्या तरुणाचा खून

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : दारू पीत असताना ग्लास सांडल्याच्या किरकोळ कारणावरून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना 15 जुलै रोजी म्हाळुंगे येथे घडली. या गुन्ह्यातील दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. निलेश सतीश धुमाळ, राजेंद्र थोरात अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, बालाजी (रा. नांदेड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी सायंकाळी माण-महाळुंगे रस्त्याच्या बाजूला कचर्‍याच्या ढिगार्‍यात एक अनोळखी मृतदेह मिळाला होता. डोक्यात मार लागल्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात उघड झाले. त्यानुसार, खुनाचा गुन्हा दाखल करून हिंजवडी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या. उपायुक्त डॉ. आनंद भोईटे, डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

…म्हणून केला खून
आरोपी निलेश आणि मयत बालाजी हे कंट्री बारमध्ये एकत्र दारू पीत होते. बालाजीकडून निलेशचा दारूचा ग्लास सांडला. त्यामुळे निलेशने काठीने, दारूच्या बाटलीने मारहाण करून बालाजीचा खून केला. खून झाल्यानंतर निलेश पळून गेला. त्यांनतर अन्य आरोपींनी बालाजीचा मृतदेह कचर्‍याच्या गाडीत घालून फेकून दिला.

Back to top button