मिनी मंत्रालयात जाण्यासाठी आश्वी गटात चुरस | पुढारी

मिनी मंत्रालयात जाण्यासाठी आश्वी गटात चुरस

संगमनेर शहर : राजेश गायकवाड : अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे डोहाळे लागल्यानंतर गट – गण व प्रभाग रचनेसह आरक्षण जाहीर झाल्याने ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समितीत जाणासाठी चढाओढीचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांच्या स्वप्नावर पडलेल्या आरक्षणातून पाणी फेरल्याचे दिसून आले आहे. कोणत्या कार्यकर्त्याना संधी मिळेल, हे नेत्याच्या हाती असल्याने उत्साही कार्यकर्ता व नेत्यांची आता उंबरठे झिजविताना दिसत आहे.

तर, दुसरीकडे प्रामाणिक कार्यकर्ते निवडणुकीपासून दूर राहण्याचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी जिल्हा परिषद गटात दिसत आहे. आश्वी गटात जिल्हा परिषदेकरिता एसटी म्हणजे ( भिल्ल, कोळी, ठाकर) समाजाला संधी तर आश्वी बु ॥ गणात सर्वसाधारण पुरुष, तर आश्वी खुर्द गणात ना. मा. प्र. स्त्री हे आरक्षण निघाल्याने, नाही ‘जीपी’ मग ‘पीएस’ बरे म्हणून थोरात – विखे यांचे कार्यकर्ते निवडणुकीचे बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या तयारीत दिसत आहेत. भाग्याकरितासुद्धा फिल्डिंग लावण्याची तयारी करताना कार्यकर्ते दिसत आहेत.

मात्र, आशिर्वाद कोणाला मिळेल, हे सांगता येत नाही, असे असले तरी काही इच्छुक कार्यकर्ते भाव खाताना दिसत आहेत. आश्वी जिल्हा परिषद गट हा प्रवरा 40 गाव परिसरातील येत असल्याने बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पा. यांचा हा बालेकिल्ला समजला जात आहे. तर, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून व जुन्या ऋणानुबंधाने राज्याचे माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव या परिसरावर आहे.

थोरात – विखे एकत्र असो अथवा नसो, 2019 सालापर्यंत सोयीच्या निवडणुकीचे राजकारण दिसले, मात्र मागील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे – थोरात काँग्रेस पक्षात असतानासुद्धा विखे यांनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. दोन्ही ठिकाणी अपक्षांची डाळ शिजली नाही, मात्र विरोधाची मात्र ठिणगी पडली. कुठलाही कार्यक्रम असो एकमेकांवर टीका- टिपण्णी होताना दिसत आहे. आता दोन्ही नेत्यांची भूमिका वेगळी व पक्षही वेगळा असल्याने मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रयत्न होणार, यात तिळमात्र शंका नाही.

मागील निवडणुकीत थोड्या फरकाने पराभूत होऊनसुद्धा विजय हिंगे हे आ. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आश्वी व परिसरात सातत्याने विकासकामाच्या व लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी चमकत राहिले. आता थोड्याच दिवसांत होणार्‍या जिल्हा परिषद निवडणुकीत अनेकांची इच्छा दिसत आहे. मात्र, वरिष्ठांचा कोणावर आशीर्वाद पडेल, हे सांगता येत नाही. जिल्हा परिषदेकरिता विखे – थोरात यांच्याकडून शोधाशोध सुरु आहे.

मात्र, रिपाइं व एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल बर्डे यांनी कंबर कसल्याचे दिसत आहे. एस. टी. महिला राखीव मुळे सध्यातरी उत्साह दिसत नाही. मात्र चिंचपूर बु. ॥, चिंचपूर खुर्द, निमगावजाळी, उंबरी बाळापूर, सादतपूर, औरंगपूर , आश्वी बु. ॥ मिळवून आश्वी बु. ॥ गण हा सर्व साधारण पुरुष झाल्याने बाळासाहेब थोरात यांच्याकडून सध्यातरी विजयराव हिंगे यांच्याच बोलबाला दिसत आहे, मात्र, चिंचपूरचे तरुण तडफदार सरपंच विवेक तांबे, आश्वी बु. ॥ चे उपसंरपच राहुल जर्‍हाड, तर विखे गटाच्या प्रभाकर निघुते, मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे, सुनील डेंगळे यांच्यासह माजी पं. स. सदस्य सरुनाथ उंबरकर , रिपाइंचे आशिष शेळके, गणेश गायकवाड हे इच्छुक बाशिंग बांधून तयार आहेत.

Back to top button