
उरुळी कांचन : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या आवारात नंग्या तलवारी घेऊन हैदोस घालून दहशत माजविण्याचा प्रकार करणार्या सहा विद्यार्थ्यांना लोणी काळभोर पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेले सर्व विद्यार्थी हे अल्पवयीन असून, पोलिसांकडून दिवसभर चौकशी सुरू आहे.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयात मंगळवारी (दि.2) सकाळी विद्यार्थ्यांत वादावादी होऊन त्याचे पर्यवसान कोयते व तलवारी उंचावून दहशत माजविण्यापर्यंत गेले होते. टोळक्याने हैदोस घातल्याने विद्यार्थ्यांत धावपळ उडाली होती.
बुधवारी दै. पुढारीच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या भागातील ग्रामस्थांनी उरुळी कांचन पोलिस दूरक्षेत्र गाठून पोलिसांना अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवेदन दिले. तसेच संस्थेच्या विश्वस्तांनाही जाब विचारला. दरम्यान, लोणीकाळभोर पोलिसांनी सहा अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरू आहे.