पुणे : दौरा सीएमचा, ताण पोलिसांवर; मुख्यमंत्र्यांचा अतिव्यग्र कार्यक्रम | पुढारी

पुणे : दौरा सीएमचा, ताण पोलिसांवर; मुख्यमंत्र्यांचा अतिव्यग्र कार्यक्रम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नागपंचमीचा सण आणि मुख्यमंत्र्यांचे दिवसभर शहरात भरगच्च कार्यक्रम. त्यात कात्रज चौकातील आदित्य ठाकरेंची सभा त्याचा सर्वाधिक ताण मंगळवारी पोलिस यंत्रणेवर पडला. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे पुण्यात प्रथमच आगमन झाले. त्यामुळे दिवसभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांचे तब्बल 9 कार्यक्रम होते. सकाळी सात वाजल्यापासून पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला होता. रात्री दीड वाजता मुख्यमंत्र्याचे मुंबईच्या दिशेने प्रस्थान झाले तेव्हाच पोलिसांचा बंदोबस्त संपला.त्यामुळे तब्बल 18 ते 19 तास पोलिसांना राबावे लागले.

अभूतपूर्व बंदोबस्त विभागीय आयुक्तालयात आढावा बैठक ही नवीन नाही, यापूर्वीचे उपमुख्यमंत्री अजित पवार ही बैठक नियमित घेत. तेव्हा एवढा मोठा पोलिस बंदोबस्त नसायचा. सकाळी अकरा वाजता आढावा बैठकीसाठी येथे मुख्यमंत्र्याचे आगमन झाले आणि पोलिसांना क्षणभर विश्रांती भेटली. तेथील कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांनी पाणी, वडापाव, चहा असे जे मिळेल ते उभ्या-उभ्या घेत थकवा घालवला.

दीनानाथ मंगेशकर येथे प्रकाश आमटे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री रात्री दीड वाजता ठाण्याकडे रवाना झाले. त्यांच्या जाण्याच्या मार्गावर बंदोबस्त लावण्यात आला होता. याबाबत एका पोलिस कर्मचार्‍याने आपली आठवण सांगितली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याप्रमाणेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना एकदा त्यांनी पुण्यात असेच उशिरापर्यंत कार्यक्रम घेतले होते. तरी त्यांचे कार्यक्रम रात्री 11 वाजता संपले. काल मात्र प्रथमच मध्यरात्र उलटली.

 

Back to top button