पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, त्यातील 24 हजार 718 जणांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. आता प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पडताळणी करून 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली.
317 कनिष्ठ महाविद्यालयांतील 1 लाख 11 हजार 430 जागा प्रवेशांसाठी उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत 1 लाख 555 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 69 हजार 116 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरून प्रवेश अर्जाचा भाग दोन भरला. त्यापैकी 42 हजार 709 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 24 हजार 718 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, 6 हजार 820 जणांना दुसर्या, तर 3 हजार 515 विद्यार्थ्यांना तिसर्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले.
प्रवेशाच्या पहिल्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आता कागदपत्रांची पडताळणी करून 6 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे अनिवार्य आहे. पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेणार्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठी प्रतिबंध करण्यात येईल. प्रवेश घेऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरील त्यांच्या लॉगिनद्वारे प्रोसिड फॉर अॅडमिशन हा पर्याय निवडून प्रवेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रवेशाची दुसरी फेरी 7 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.