पुणे : ‘ई-पॉस’मुळे धान्याचा काळाबाजार थांबला | पुढारी

पुणे : ‘ई-पॉस’मुळे धान्याचा काळाबाजार थांबला

पुणे : स्वस्त धान्य वितरणासाठी सार्वजनिक वितरण प्रणाली (पीडीएस) कार्यान्वित आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्त्योदय अन्न व प्राधान्य कुटुंब योजनेतून धान्य वितरित केले जाते. या वितरणात ‘ई-पॉस’चा वापर सुरू केल्यापासून धान्याच्या काळाबाजाराला चाप बसला आहे. स्वस्त धान्य दुकानातून धान्याचा काळाबाजार केला जात होता. त्याला चाप बसविण्यासाठी संपूर्ण यंत्रणा ऑनलाइन करण्यात आली. त्यासाठी पीडीएस यंत्रणा विकसित करण्यात आली. त्याअंतर्गत ‘ई-पॉस’ म्हणजे ‘इलेक्ट्रॉनिक पॉइंट ऑफ सेल’ यंत्रणा प्रत्येक दुकानावर उपलब्ध करून देण्यात आली.

या यंत्रणेमुळे शिधापत्रिकाधारकाला किती आणि केव्हा धान्य वितरित केले गेले आहे, याची माहिती मिळते. त्यासाठी शिधापत्रिकेला आधार क्रमांक संलग्न असणे गरजेचे आहे. पुणे शहरात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अन्त्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतून धान्य वाटप केले जाते. त्यानुसार अन्त्योदय योजनेत 8 हजार 14 रेशनकार्डधारक आहेत. त्यांना 1 हजार 200 क्विंटल गहू व 1 हजार 600 क्विंटल तांदूळ वितरित केला जातो, तर प्राधान्य कुटुंब योजनेत 3 लाख 17 हजार 875 रेशनकार्डधारक आहेत.

त्यांना 25 हजार 911 क्विंटल गहू, तर 38 हजार 867 क्विंटल तांदूळ वितरित करण्यात आला आहे. जुलै महिन्यात पुणे शहरात सर्व योजनांतून गव्हाचे 24 हजार 261 क्विंटल वितरण करण्यात आले, तर जिल्ह्यात 51 हजार 619 क्विंटल वितरण झाले आहे. तांदळाचे पुणे शहरात 44 हजार 712 क्विंटल व जिल्ह्यात 95 हजार 59 क्विंटल वितरण करण्यात आले, अशी माहिती पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Back to top button