पुणे : सर्वाधिक कोरोना चाचण्या बी. जे. शासकीय महाविद्यालयात | पुढारी

पुणे : सर्वाधिक कोरोना चाचण्या बी. जे. शासकीय महाविद्यालयात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: आजपर्यंत बी.जे.मध्ये 7 लाख 57 हजार 865 कोरोना चाचण्या पार पडल्या आहेत. राज्यातील सर्वाधिक कोरोना चाचण्या बी. जे. शासकीय महाविद्यालयात झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या तिन्ही लाटांमध्ये बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयाने नेटाने लढा दिला. कोरोना चाचण्या टप्प्याटप्प्याने वाढवण्यात आल्या आहेत. पहिल्या लाटेपासून पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. ससून रुग्णालयात केवळ पुण्यातीलच नव्हे, तर राज्यभरातील रुग्ण उपचारांसाठी दाखल होत होते.

कोरोना नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करून निदान करणे आणि रुग्णांना उपचार देऊन कोरोनामुक्त करणे आवश्यक होते. बी. जे. शासकीय महाविद्यालयाने पहिल्या लाटेपासूनच चाचण्यांवर भर दिला. आतापर्यंत बी. जे. मध्ये 6 लाख 67 हजार आरटीपीआर चाचण्या, तर 93 हजार 180 अँटिजेन चाचण्या पार पडल्या आहेत. राज्यात कोरोना चाचण्या तपासणी करणार्‍या 74 शासकीय प्रयोगशाळा या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत.

काही प्रयोगशाळा महापालिकेची रुग्णालये, जिल्हा रुग्णालये आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे आहेत. यामध्ये बी. जे. वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाने सर्वाधिक चाचण्यांचा विक्रम केला आहे. प्रयोगशाळेतील तंत्रज्ञ, सहायक व सहयोगी प्राध्यापक व प्राध्यापक यांची मेहनत आणि अधिष्ठाता यांच्यामुळे हे शक्य झाले आहे, अशी माहिती सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

आकडे काय सांगतात?
एकूण कोरोना चाचण्या- 7 लाख 57 हजार 865
आरटीपीसीआर चाचण्या – 6 लाख 67 हजार
अँटीजेन चाचण्या – 93 हजार
रोज 250 ते 300 चाचण्या
पॉझिटिव्हिटी दर – 10 टक्के
तपासणीचा कालावधी – साडेतीन तास

Back to top button