पुणे : कळंब रस्त्यावर झाडे-झुडपांची वाढ | पुढारी

पुणे : कळंब रस्त्यावर झाडे-झुडपांची वाढ

मंचर, पुढारी वृत्तसेवा : राणूबाई मंदिर लौकी ते महावितरण कार्यालय कळंब या रस्त्यावर झाडे-झुडपे वाढली आहेत. झाडांमुळे समोरून येणारी वाहने न दिसल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने रस्त्यावर आलेली झाडे तोडावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा माजी सरपंच संदेश थोरात यांनी दिला आहे.

संदेश थोरात यांनी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला याबाबत निवेदन दिले आहे. मधला मळा व पाचघरवस्ती येथील नागरिकांना राणूबाई मंदिरमार्गे कळंब, मंचर आणि नारायणगाव येथे जाण्यासाठी हा सोयीचा रस्ता आहे. रस्त्यावर शेतीमालाची वाहतूक करणारे पिकअप, दूधगाड्या, स्कूलबस, दुचाकी वाहनांची वर्दळ असते.

रस्त्यावरील अवघड वळणावर झाडे-झुडपे वाढल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे येथे जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढलेल्या झाडा-झुडपांनी रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे झाडे-झुडपे संबंधित विभागाने तत्काळ लक्ष देऊन काढावीत, असे निवेदनात म्हटले आहे.

Back to top button