पुणे : विधवांना मान देऊन नागपंचमी साजरी | पुढारी

पुणे : विधवांना मान देऊन नागपंचमी साजरी

शिरूर, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय मराठा महासंघ व रामलिंग महिला उन्नती संस्थेने नागपंचमीच्या प्रथेला फाटा देत वारुळात दूध सोडण्या ऐवजी गरजू चिमुकल्यांना दूध वाटप केले. तसेच विधवांना सुवासिनींचा मान देऊन अनोख्या पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला.

गेल्या काही वर्षापासून या संस्था प्रथेप्रमाणे नागपंचमी साजरी करण्या ऐवजी गरजू चिमुकले व विधवांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करीत आहेत. समाजात आजही अशी अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबातील मुलांना घोटभर दूधही मिळत नाही. वारुळात दूध सोडण्याऐवजी अशा मुलांना जर नागपंचमीच्या दिवशी दूध वाटप केले तर खर्‍या अर्थाने हा सण साजरा होईल.अशी धारणा संस्था असल्याचे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला तालुकाध्यक्षा शशिकला काळे व रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी सांगितले.

आज नागपंचमी निमित्त या संस्थांनी रामलिंग (शिरूर ग्रामीण) येथील वस्तीमध्ये जाऊन मुलांना दूध वाटप केले.
सामाजिक प्रथा परंपरेचा जोखडामुळे सण, उत्सवापासून कायम वंचित राहत असलेल्या विधवांनाही काळे व कर्डिले यांनी साडी चोळी देऊन त्यांना सुवांसिनींचा मान दिला. सुवासिनींप्रमाणे मान मिळाल्याने त्यांनाही अश्रू अनावर झाले.
यावेळी शिरूर ग्रामीणचे सरपंच नामदेव जाधव, रमेश चव्हाण, हिरामण जाधव, अ‍ॅड. रवींद्र खांडरे, नामदेव चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

Back to top button