पुणे : कलगीतुर्‍याला तोच जल्लोष, त्याच टाळ्या! | पुढारी

पुणे : कलगीतुर्‍याला तोच जल्लोष, त्याच टाळ्या!

लोणी-धामणी, पुढारी वृत्तसेवा : नागपंचमीनिमित्त लोणी (ता. आंबेगाव) येथे राज्यातील भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे हे 28 वे वर्ष होते. मागील दोन वर्षे कोरोना महामारीमुळे कलगीतुरा झाला नाही. त्यामुळे यंदा हा कार्यक्रम पाहण्यासाठी येथील बाजारतळ गर्दीने फुलून गेला होता. शाहीर रामदास गुंड आणि कंपनी तुरेवाले (ता. पारनेर) विरुद्ध शाहीर नानासाहेब साळुंखे आणि मंडळी कलगीवाले (ता. श्रीगोंदा) यांच्यात जोरदार कलगीतुरा रंगला.

ढोलकी, टाळ, डफ, संबळ व तुणतुण्याच्या तालावर रंगलेला हा जंगी सामना उपस्थित रसिकांच्या मनात व कानात ज्ञानाची भर टाकून गेला. डफाची थाप, ढोलकीचा गगनभेदी आवाज, शाहिरांनी पहाडी आवाजात सादर केलेली कवने उपस्थितांची दाद घेऊन जातात. देशभक्ती, सर्वधर्मसमभाव, मातृ-पितृभक्ती, विविध धार्मिक सवाल-जबाब या विषयांवर सादर झालेली कवने यांनी उपस्थितांचे डोळे पानावले.

गणगौळण, रामायण, महाभारत, पुराणकथा, शास्त्रीय सवाल, गणिती सवाल व लौकिक सवाल अशा विविध विषयांवर कलगीवाले व तुरेवाले यांचा सवाल चांगलाच रंगला. कार्यक्रम पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा तालुक्यातील व लोणी- धामणी परिसरातील श्रोत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेत्यांनी सदिच्छा भेटी दिल्या. यामध्ये भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे, विजय पवार, शिवसेनेचे अ‍ॅड. अविनाश रहाणे, राजाराम बानखेले, पारगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक ताठे आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन माजी सरपंच उद्धव लंके यांनी केले.

Back to top button