पुणे : एकलहरेतील बाह्यवळण धोकादायक | पुढारी

पुणे : एकलहरेतील बाह्यवळण धोकादायक

मंचर, पुढारी वृत्तसेवा : एकलहरे (ता. आंबेगाव) येथील नवीन पुणे- नाशिक महामार्ग बाह्यवळणाजवळील रस्ता अपघाताचे ठिकाण बनला आहे. अपघात टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग रस्ते विभागाने उपाय योजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

एकलहरे येथे महामार्ग बाह्यवळणाजवळ आठवड्यातून दोन-तीन वेळा अपघात होतच असतात. या ठिकाणी मंचर मार्गे नारायणगावाकडे जाणारी वाहने अतिशय वेगाने जातात. नारायणगावच्या दिशेने जाणार्‍या गाडीला रस्त्यामध्ये ड्रायव्हरशन व डीवायडरची सोय नाही. तसेच सर्व्हिस रस्त्याचे कामही प्रलंबित असून, मुख्य पुणे-नाशिक महामार्गाचे कामही मंदगतीने चाललेले आहे. परिणामी अनेक ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत.

नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटीचे मंदगतीने काम चालू असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. रस्त्यावरील वाहनांची गती कमी करण्यासाठी स्पीड ब्रेकर, सर्विस रस्ता आणि रस्त्याच्या मधोमध रस्ता दुभाजक लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.

अपघात होणार्‍या ठिकाणांवर गतिरोधकांची गरज

रस्त्यावर हॉटेल रविकिरणच्या पुढील बाजूस दोन्ही बाजूने तात्पुरत्या स्वरूपात स्पीड ब्रेकर टाकावेत, अशी मागणी हॉटेल व्यावसायिक रामचंद्र गाडे यांनी केली आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. काही जण मृत्युमुखीही पडले आहेत.

Back to top button