पुणे : भीमाशंकर परिसरात रानफुलांचा बहर | पुढारी

पुणे : भीमाशंकर परिसरात रानफुलांचा बहर

भीमाशंकर, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर परिसरात पावसामुळे रानफुलांनी परिसर सजला आहे. सर्वत्र हिरवळीची व धुक्यांची शाल, अधूनमधून पडणार्‍या श्रावणसरी पर्यटकांना खुणावत आहेत. पोखरी घाटातील गोहे पाझर तलाव भरून वाहत असून ओढे – नालेही भरून वाहत आहेत.

भीमाशंकर, पाटण, आहुपे परिसरात सध्या अधूनमधून येणारा पाऊस, दाट धुके, बोचरी थंडी असे वातावरण आहे. डोंगर-टेकड्या हिरवा शालू पांघरूण आभाळालाही लाजवेल अशी नटून बसल्या आहेत. निसर्गाचा सहवास घेण्यासाठी पर्यटकांनी येण्यास सुरुवात केली आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या दर्शनासह नागफणी पॉईंट, गुप्त भीमाशंकर, हनुमान तळे, मुंबई पॉइंट, डिंभे धरण, कोंढवळ धबधबा, आहुपे यांसह भीमाशंकर अभयारण्यात फिरण्यासाठी मुंबई- पुणे व इतर राज्यांतुन पर्यटक येत आहेत. माळीण नवीन व जुने गाव, आहुपे येथील कोकणकडे व निसर्गाचा खजाना पर्यटक मनमुराद लुटत आहेत.

Back to top button