पुणे : एसटी-पिकअपची धडक; 35 जखमी | पुढारी

पुणे : एसटी-पिकअपची धडक; 35 जखमी

मंचर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक हमरस्त्यावर एकलहरे (ता. आंबेगाव) येथे पुलाच्या पुढील बाजूस पिकअप आणि एसटी बसमध्ये धडक होऊन पिकअपमधील तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटी बसमधील अंदाजे 30 ते 35 प्रवाशांवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात व खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मंगळवारी (दि. 2) दुपारी 3.15 च्या सुमारास हा अपघात झाला.

राजुरी येथून पुण्याकडे दूध घेऊन जाणारी पिकअप (एमएच 14 / 0881) जात असताना मंचरच्या दिशेने नाशिककडे जाणारी बसच्या (एमएच 14 बीटी 4079) चालकाने चुकीच्या बाजूने पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने समोरासमोर पिकअप गाडीला जबरदस्त धडक दिली. या धडकेमध्ये पिकअपमध्ये असणार्‍या तीन प्रवाशांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बसमधील तीस ते पस्तीस प्रवाशांना डोक्याला, तोंडाला व हाताला किरकोळ जखमा होऊन मुका मार लागला आहे.

अपघात झाल्यानंतर बसचालक संजय केदार हा तेथून फरार झाला. घटनेची माहिती संतोष गुळवे यांनी मंचर पोलिसांना कळवली. घटनास्थळी मदत करण्यासाठी एकलहरे गावचे उपसरपंच दीपक डोके, सद्गुरू खेबडे, संतोष गुळवे, रामचंद्र गाडे, सुधीर फलके, तुषार गायकवाड, अशितोष लोंढे, सुमीत फलके, गणेश डोके यांच्यासह अनेक तरुणांनी मदत केली.

अपघातामुळे महामार्गच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी अपघातग्रस्तांना नेण्यासाठी मंचर परिसरातील रुग्णवाहिका चालकांनी धाव घेतली. जखमींना मंचर उपजिल्हा तसेच खासगी दवाखान्यात दाखल केले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंचर पोलिस स्टेशनचे एस. झुंझुर्डे आणि एम. व्ही. भालशिंगे यांनी मदत केली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी जखमींची विचारपूस केली आहे.

Back to top button