पुणे : लहान मुलांच्या आजारांनी पालक चिंतीत | पुढारी

पुणे : लहान मुलांच्या आजारांनी पालक चिंतीत

नानगाव, पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यातील भीमाकाठच्या गावांत सध्या लहान मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. आजारामुळे दवाखान्यात लहान मुलांची मोठी गर्दी दिसून येत आहे. विषाणूजन्य व संसर्गजन्य आजारांचे प्रमाण मोठे आहे. मुलांच्या आजारामुळे पालकांमधील चिंता वाढली आहे.

कोरोना संसर्गजन्य आजाराची तिव्रता कमी झाल्यामुळे सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. जून महिन्यात शाळा भरल्या आणि पावसाळा सुरू झाला. परिणामी वातावरणातील बदलानेही लहान मुलांच्या आजारात वाढ झाली आहे. शाळेत मुलं एकत्र खेळतात, एकत्र बसतात, त्यामुळे संसर्ग वाढून मुले आजारी पडण्याचे प्रमाणदेखील जास्त आहे. ताप, सर्दी, खोकला, पेशींचे आजार याची लक्षणं आढळून येत आहे.
पावसाळ्यात कीटकजन्य, जलजन्य आजारांच्या प्रमाणात वाढ होत असते. सध्या ठिकठिकाणी पाण्याची गटारी साठलेली दिसून येत आहे.

मुळे डासांचे प्रमाण वाढत असून डासांपासून होणार्‍या आजारामध्येही वाढ होत चालली आहे. पाण्याची टाकी, फ्रिज अशा ठिकाणीही डासांची उत्पत्ती होत आहे. मागील दोन वर्षांपासून जग कोरोना संसर्गाशी लढत होते. कोरोनाचे संकट कमी होत असले तरीदेखील कोरोना गेलेला नाही, हे नागरिकांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच हवामान बदलामुळे मोठ्या नागरिकांबरोबरच लहान मुलेही मोठ्या प्रमाणावर आजारी पडत आहेत.

सध्या लहान मुलांमध्ये सर्दी, ताप, खोकला, पेशी यांसारख्या आजारांची लक्षणे दिसून येत आहे; तसेच काही मुलांच्यामध्ये हँन्ड, फुट अँन्ड माऊथ डिसीज या आजाराचीदेखील लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे मुलं आजारी पडल्यास त्वरित डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत.

                                                          – डॉ. संदीप रणदिवे, एम.डी. बालरोगतज्ज्ञ

हवामान बदल तसेच पावसाळी वातावरणामुळे लहान मुले आजारी पडत आहेत. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी त्वरित दवाखान्यात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. नागरिकांनी कोरोना लसीकरण व बूस्टर डोस घ्यावा.

                                                   – डॉ. सुरेखा पोळ, तालुका आरोग्य अधिकारी, दौंड

Back to top button