प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्हा मागे | पुढारी

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्हा मागे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत गतवर्षीपेक्षा जेमतेम 51 टक्केच शेतकर्‍यांनी सहभाग घेतल्याने योजनेतील पीछेहाटीस जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे. कृषी आयुक्तालयाचे मुख्यालय पुण्यात असूनही जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाच्या कामकाजाच्या उणिवा चव्हाट्यावर आल्या आहेत.

आपत्ती काळात शेतकर्‍यांना आर्थिक संरक्षण विम्याद्वारे मिळावे यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारही प्रयत्नशिल आहे. या संपूर्ण कामाचे नियोजन आणि नियंत्रण कृषि आयुक्तालय स्तरावरुन होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत खरीप हंगाम 2021 मध्ये पुणे जिल्ह्यात 14 हजार 566 शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता. तर चालू वर्षी 31 जुलैअखेर केवळ 7 हजार 420 शेतकर्‍यांनीच सहभाग घेतला आहे. कृषि विभाग, बँकांच्या प्रयत्नांना शेतकर्‍यांच्या सहभागाची जोड वाढविण्यातच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय कमी पडल्याचे दिसत आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यात गतवर्षीच्या खरिपात सुमारे चौदा हजारांहून अधिक शेतकर्‍यांचा सहभाग राहिला होता. तो सध्या साडेसात हजारांच्या आसपास आहे. योजनेत पीकनिहाय सहभागी शेतकर्‍यांची संख्या तूर्त काढलेली नाही.
                                   – ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

Back to top button