गड्या, पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी ! फुरसुंगीतील नागरिकांची भावना | पुढारी

गड्या, पालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी ! फुरसुंगीतील नागरिकांची भावना

फुरसुंगी : पुढारी वृत्तसेवा : फुरसुंगी गावाचा पुणे महापालिकेत समावेश होऊन पाच वर्षे उलटून गेली आहेत. मात्र, नागरिकांच्या मूलभूत समस्या अद्यापही तशाच असून, करांचा बोजा मात्र वाढला आहे. त्यामुळे गावाला महापालिकेतून वगळण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत फुरसुंगी गावातील श्री शंभू महादेव मंदिरात नागरिकांची बैठक आयोजित केली होती. या वेळी महापालिकेपेक्षा ग्रामपंचायत बरी होती, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.

या संदर्भात मुख्यत्र्यांना निवेदन देण्यात आले. फुरसुंगीतील सामाजिक कार्यकर्ते नीलेश पवार, गणेश कामठे, ज्ञानेश्वर कामठे, विशाल हरपळे, गोरख कामठे, दुर्योधन कामठे, धनंजय कामठे, किरण हरपळे, महेश हरपळे, सुहास खुटवड यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. पुणे महापालिकेत फुरसुंगीचा समावेश झाल्यापासून कोणतीही अतिरिक्त सुविधा महापालिकेकडून फुरसुंगीला मिळाली नाही. फुरसुंगी गावात कोणत्याही नवीन प्रकारची विकासकामे झाली नाहीत.

मात्र, नागरिकांवर करांचा बोजा वाढला आहे. नव्याने क्रीडांगण, नाट्यगृह, ज्येष्ठ नागरिक कट्टा, वाचनालय, पदपथ, उद्यान, वाहनतळ या गोष्टी, तर दूरच, पण रहिवाश्यांना मूलभूत गरज असलेल्या पिण्याचे पाणीही आठ-आठ दिवस मिळत नाही. याबाबत या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कामठे, राजाभाऊ सूर्यवंशी, बाळासाहेब हरपळे, संदीप हरपळे, ज्ञानेश्वर कामठे, भाऊसाहेब पवार आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महापालिकेतून गाव वगळण्याची मागणी
या बैठकीत नागरिकांनी गावातील विविध समस्यांचा पाढ वाचला. गावाचा महापालिकेत समावेश झाल्यापासून सध्या मूलभूत सुविधाही उपलब्ध झाल्या नाहीत. तसेच रहिवाशांना पुरेसे पाणीसुद्धा देण्याची सुविधा प्रशासनाने उपलब्ध केली नाही, यामुळे गाव महापालिकेतून वगळण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली.

नागरिकांनी मांडलेल्या समस्या
फुरसुंगी परिसरात जागोजागी कचर्‍याचे ढीग आरोग्य सुविधांपासून अद्यापही नागरिक वंचित
गावात सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव परिसरातील ओढे-नाल्यांवर अतिक्रमणे
अनेक ठिकाणी सांडपाण्याची व्यवस्था नाही. गावातील काही रस्त्यांची मोठी दुरवस्था

Back to top button