पुणे : वाहतूक कोंडी, कचर्‍याच्या विळख्यात सिंहगड | पुढारी

पुणे : वाहतूक कोंडी, कचर्‍याच्या विळख्यात सिंहगड

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : सिंहगड किल्ल्यावर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी व कचर्‍याची समस्या गंभीर होत चालली आहे. घाटरस्त्यावर होणार्‍या प्रचंड वाहतूक कोंडीचा फटका पर्यटकांसह स्थानिकांना बसत आहे. महिनाभरात सिंहगडावर अडीच लाखांवर पर्यटकांनी हजेरी लावली आहे.

पर्यटकांकडून वनखाते दर आठवड्याला तीन ते चार लाख रुपयांचा टोल वसुली करत आहे. सुट्टीच्या दिवशी गडावर कांदाभजी, झुणका भाकर, खाद्यपदार्थ विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. असे असले तरी गडावर स्वच्छता व वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. त्यामुळे गडाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक विक्रेते व खासगी वाहनचालक वनखात्याच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रस्त्याच्या गटारांची दुरुस्ती, अवसरवाडी फाट्यावर गेट, साईड पट्ट्यांची दुरुस्ती करण्यासाठी वनविभागाने हालचाली सुरू केल्या आहेत.

प्लास्टिक कचऱ्याचा ढिग

प्लास्टिक बंदी असूनही शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी गडावर मोठ्या प्रमाणात कचरा पडत आहे. घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुरक्षारक्षकांना धावपळ करावी लागते. गडावरील वाहनतळ तसेच घाट रस्त्यावर वाहतुकीचे नियोजन करूनही वाहनतळाच्या रस्त्यावर, अवसरवाडी फाट्यावर तसेच ठिकठिकाणी घाट रस्त्यावर वाहने उभी करणार्‍या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत चालली आहे. धोकादायक बुरुज, दरडी, कड्यावर जाणार्‍या पर्यटकांना आवर घालण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. त्यास न जुमानता हिंस्र प्राण्यांचा वावर असलेल्या जंगलात, डोंगरात पर्यटक मौजमजा करत आहेत. वाहतूक कोंडी तसेच गडावर दिवसभर थांबणार्‍या पर्यटकांमुळे सुट्टीच्या दिवशी निम्म्याहून अधिक पर्यटकांना माघारी जावे लागते.

याबाबत मंगळवारी (दि.2) झालेल्या बैठकीत गडाच्या स्वच्छतेसाठी स्थानिक विक्रेते व खासगी जीपचालकांनी सिंहगडाच्या स्वच्छतेचा निर्धार केला. वनविभागाचे वनरक्षक बाबासाहेब जिवडे, माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय जोरकर, माजी सरपंच विश्वनाथ मुजुमले, घेरा सिंहगडचे उपसरपंच गोफणे, माऊली कोडीतकर आदी सहभागी झाले होते.

वनरक्षक जिवडे म्हणाले, गडावर पडणार्‍या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक विक्रेते सहभागी होणार आहेत.
घाट रस्त्याच्या अरुंद गटारात वाहने कोसळण्याचे प्रकार घडत आहेत, अशा ठिकाणाची दुरुस्ती करण्याचे बांधकाम विभागाला कळविण्यात आले आहे.

सिंहगड घाट रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अवसरवाडी टोलनाक्यावर गेट बसवण्यात येणार आहे. तसेच गोळेवाडी व अवसरवाडी या दोन्ही मार्गांच्या घाटरस्त्यावर तसेच जंगलात वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येणार आहे.

                              – प्रदीप सकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी, भांबुर्डा (पुणे) वनविभाग

Back to top button