विजेच्या लपंडावाने मोशीकर हैराण | पुढारी

विजेच्या लपंडावाने मोशीकर हैराण

मोशी : पुढारी वृत्तसेवा : गेल्या अनेक दिवसांपासून मोशीतील बोराटेवस्ती आणि परिसरातील नागरिक सततच्या वीज खंडित होण्यामुळे त्रस्त झाले आहेत. बाजार समिती चौकात अनेक वर्षांपासून विजेची केबल वारंवार जळत असल्याने संपूर्ण बोराटेवस्ती, हजारेवस्ती येथील नागरिक चार ते पाच दिवस अंधारात काढत आहेत. कित्येक दिवसांपासून हा प्रश्न मार्गी लागत नाही. नागरिकांबरोबरच या भागात अनेक लहान व्यावसायिकदेखील सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याने पुरते हैराण झाले आहेत.

40 वर्षांपासून हा भाग महापालिकेत समाविष्ट आहे. मात्र, अद्यापपर्यंत या ठिकाणी वीज वाहिन्या भूमिगत करण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे काही वॉर्डांवर कोट्यवधींचा खर्च करण्यात येत आहेत. मात्र, या ठिकाणी कायमच समस्या आ वासून उभ्या आहेत. सततचा खंडित , अनियमित आणि कमी दाबाचा वीजपुरवठा या नागरीकांच्या नशिबात आहे. छोट्या व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसत आहे. यावर महावितरण कंपनीकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पुणे-नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूला मागील काही महिन्यांपासून खंडित व अनियमित वीजपुरवठ्यामुळे या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. एकीकडे महावितरण कंपनी कोणत्या ना कोणत्या मार्गाने वीज बिलात सतत वाढ करत आहे. मात्र, वीजपुरवठा सुरळीत करण्यात अपयशी ठरत आहे. या भागात वीज वाहिन्या भूमिगत करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशी संतोष बोराटे यांनी केली आहे.

Back to top button