पुणे : वरघडच्या आजी-आजोबांची पाण्यासाठी दररोज मृत्युशी झुंज | पुढारी

पुणे : वरघडच्या आजी-आजोबांची पाण्यासाठी दररोज मृत्युशी झुंज

वेल्हे, पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर व जिल्ह्याची तहान भागविणारे पानशेत धरणाच्या तीरावरील वरघड (ता. वेल्हे) येथील वयोवृद्ध आजी- आजोबांसह आदिवासी, धरणग्रस्तांना हंडाभर पाण्यासाठी तुडुंब भरलेल्या पानशेत धरणातील पाणी पिण्यासाठी आणण्याकरीता दररोज मृत्युशी झुंज द्यावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही येथील भूमिपुत्रांचा जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

वयाची सत्तरी -ऐंशी वर्षे ओलांडलेले, डोक्यावर हांडे घेऊन पायपीट करून उंच डोंगर टेकड्यांतून चढ उतार करत धरणातील पाणी वाहून आणत आहेत. त्यासाठी तब्बल तीन किलोमीटर अंतराची अत्यंत धोकादायक ये जा करावी लागत आहे. या वाटेने चांगल्या धनधाकट माणसाला साधे चालणेही अवघड आहे. त्या पाऊलवाटांनी आजी आजोबा डोक्यावर हांडे घेऊन सहज चढाई करत आहेत.

डोक्यावरून भरलेला पाण्याचा हंडा घेऊन निसरड्या खडकावरून चढताना सत्तर वर्षांच्या पार्वती शंकर तांबे या पाय घसरून कोसळल्या. त्या वेळी सोबतीला असलेल्या विजाबाई बंडा तांबे, वहिराबाई किसन तांबे या आजींनी त्यांना सावरले, त्यामुळे सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही. गेल्या दोन महिन्यांत अनेकदा पाय घसरून तसेच तोल जाऊन आजी-आजोबा खाली कोसळले आहेत. मात्र, घरी मुलं-बाळ नसल्याने पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी पुन्हा दुसर्‍या दिवशी हांडे घेऊन धरणावर जात आहेत. रेवबाई राघू तांबे, लक्ष्मण सखाराम भरेकर, शंकर धोंडिबा तांबे , किसन धोंडिबा तांबे आदी आजी-आजोबांना तसेच आदिवासी कातकरी समाज, धरणग्रस्तांना हंडाभर पाण्यासाठी दररोज संघर्ष करावा लागत आहे. स्थानिक मावळा संघटनेचे सुदाम तांबे व रमाकांत भरेकर यांनी पाणीपुरवठा योजना तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.

नळपाणी योजना बंद

ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजना बंद पडल्याने ऐन पावसाळ्यात दोन महिन्यांपासून वरघड गाव व परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. वरघडचे ग्रामसेवक गजानन पवार म्हणाले, पाणी योजनेत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे. तातडीने आवश्यक कामे पूर्ण करून पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे.

Back to top button