उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांचा धिंगाणा | पुढारी

उरुळी कांचनमध्ये विद्यार्थ्यांचा धिंगाणा

उरुळी कांचन : पुढारी वृत्तसेवा : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाच्या पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थ्यांच्या टोळक्याने अक्षरशः हैदोस घातल्याचा अतिशय गंभीर प्रकार मंगळवारी (दि. 2) सकाळी घडला. विद्यार्थ्यांत सुमारे तासभर दहशत, शिवीगाळ व धुडगूस सुरू होता. काही विद्यार्थ्यांनी नंग्या तलवारी दाखवून दहशत निर्माण केली.

या घटनेने उरुळी कांचन शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसह शिक्षणाचा खेळखंडोबा उडाल्याचे विदारक चित्र दिसले आहे. महाविद्यालयाच्या वेळेत सकाळी 9 ते 10 पर्यंत हा धुडगूस सुरू होता. हा वाद शहरातील रस्त्यापर्यंत येऊन पोहचला आहे. वाद इतका टोकाला गेला की, हे विद्यार्थी एकमेकांवर धावून जाऊन हत्यारे दाखवून अक्षरशः दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत होते. स्थानिकांनी विद्यार्थ्यांना जाब विचारल्याने हे टोळके परिसरातून पळ काढून गेले.

उरुळी कांचनमध्ये महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विद्यालय, कनिष्ठ तसेच वरिष्ठ महाविद्यालय असून पूर्व हवेली, दौंड तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने येथे शिक्षण घेत आहेत. मात्र, या ठिकाणी विद्यार्थ्यांची टपोरीगिरी, दादागिरी असे प्रकार सर्रास सुरू असतात, हे विद्यार्थी शहरात प्रवेश केल्यानंतर दुचाकी वाहनांवरून घिरट्या घालणे, टोळी टोळीने वावरणे, महाविद्यालयीन आवारात धुडगूस घालणे हे प्रकार नित्याचे झाले आहेत. विद्यार्थिनींची छेड काढणे, मारामारी करणे असे सर्रास प्रकार घडत आहेत. मंगळवारीही सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थी आवारात गोंधळ घालत असल्याचे ग्रामस्थांना पाहायला मिळत होते.

संस्था घेईना दखल, पोलिसांतही करेना तक्रार
हा सर्व गंभीर प्रकार आवारात घडून ही शिक्षण संस्थेने कोणतीच कारवाईची दखल घेतली नसून पोलिसांपर्यंत अद्याप तक्रारच झाली नसल्याची स्थिती आहे. प्रत्येक वेळी विद्यार्थी धुडगूस घालतात, विद्यार्थिनींंची छेडछाड होते, मात्र राजकारणी लोक या सर्व प्रकारांना दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याने एक दिवस महाविद्यालयात 2014 प्रमाणे विद्यार्थ्याचा खून होण्याचा प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत.

महाविद्यालयातील धुडगूस झाल्याचा प्रकार कानावर आला आहे. स्थानिक पोलिस बंदोबस्तावर असल्याने या ठिकाणी जाऊ शकले नाहीत. संस्थेकडून प्रत्यक्ष तक्रार झाली नसल्याने स्थानिक माहिती काढून विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रकार करणार्‍यांची गय करण्यात येणार नाही.
                                       – किरण धायगुडे, पोलिस उपनिरीक्षक, उरुळी कांचन

Back to top button