पिंपरी : मनपा महिला अधिकार्‍यांचा साडी गणवेशाला विरोध | पुढारी

पिंपरी : मनपा महिला अधिकार्‍यांचा साडी गणवेशाला विरोध

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकारी वर्ग 1 व 2 यांना 15 ऑगस्टपासून गणवेश पद्धती लागू करण्यात आली आहे. मात्र, या गणवेश पद्धतीमध्ये महिला अधिकारी यांना साडी हा गणवेश दिला असल्याने महिला अधिकार्‍यांना निर्णय अन्यायकारक वाटत आहे. कामाच्या ठिकाणी वावरताना ड्रेसच कर्न्फटेबल आहे, अशी भावना महिलांमध्ये आहे.

महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेतील पुरुष अधिकारी वर्ग 1 यांस मायक्रोचेक्स ब्लू शर्ट आणि सफायर नेव्ही ब्लू रंगाची पँट, असा गणवेश तर महिला अधिकारी वर्ग 1 यांस निळ्या आणि पिवळ्या रंगाची प्रिन्टेड क्रेप कॉर्पोरेट साडी, असा गणवेश दिला आहे. तसेच पुरुष अधिकारी वर्ग 2 यांस पिन्स स्ट्राईन लाईट ब्लू शर्ट आणि सफायर नेव्ही ब्लू रंगाची पँट तर महिला अधिकारी वर्ग 2 यांस निळ्या रंगातील प्रिन्टेड क्रेप कॉर्पोरेट साडी हा गणवेश दिला आहे.येत्या 15 ऑगस्टपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

संबंधित अधिकारी यांनी नेमून दिलेल्या गणवेशाचे कापड स्वखर्चाने खरेदी व शिलाई करायची सूचना देण्यात आली आहे. आयुक्तांनी जेव्हा सुरत महापलिकेचा दौरा केला. त्यावेळी ही संकल्पना दोन वर्षापूर्वी देखील त्यांनी मांडली होती. यांस सर्व कर्मचार्‍यांनी विरोध केला होता. पण आता हा नियम अनिवार्य केला असल्याने हा निर्णय म्हणजे एक प्रकारचा कर्मचार्‍यांविरोधात फतवा असल्याचे म्हणणे आहे.

इतर महिला अधिकार्‍यांनी सांगितलेल्या समस्या
वैद्यकीय विभागात अ‍ॅप्रन हा गणवेश ठरवून दिला आहे. बायोमेट्रिक हजेरीमुळे सकाळी 9 वाजता वेळेत पोहचण्याकरिता साडी नेसणे त्रासदायक, वेळखाऊ आणि डॉक्टर म्हणून काम करताना अनकम्फर्टेबल आहे. नर्सेसचा संपूर्ण युनिफॉर्म बदलणे केवळ शासनाच्या हातात आहे. सार्वजनिक संस्थेमध्ये काम करताना साडी पारंपरिक पोशाख असला तरी रोज वापरायला अडचणीचा आहे. आयटी व कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देखील गणवेश नाही. गणवेशात धुलाई खर्च भत्ता मिळत नाही. गेल्या काही वर्षांत अ‍ॅप्रनचे कापडही पूर्वीप्रमाणे मिळाले नाही. त्यामुळे अ‍ॅप्रनचे कापड, शिलाई इतर खर्च स्वत: करत आहोत. राज्यात एकाही महापालिकेला अद्याप गणवेश नाही.

महापालिकेने महिलांना जो गणवेश दिला आहे. त्याची आमच्या ग्रुपवर खूप चर्चा होत आहे. बहुतांश महिला अधिकारी वर्ग 1 चा या निर्णयास विरोध आहे. साडी हा पारंपरिक पोशाख असला तरी त्यामुळे महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. त्यामुळे काम करताना फार अनकम्फर्टेबल वाटते. त्यामुळे जसे आहे तसेच सुरू ठेवावे, अशी भावना नाव न टाकण्याच्या अटीवर महिला कर्मचार्‍याने व्यक्त केली.
-महिला कर्मचारी

आम्हा गृहिणी असणार्‍या महिलांना कामाच्या गडबडीत साडी घालायला पुरेसा वेळ नसतो. कित्येक कर्मचारी पुण्याहून येतात. यायला एक ते दीड तास लागतो. त्यामुळे हा निर्णय अन्यायकारक आहे.
-महिला कर्मचारी

महिला अधिकार्‍याकडून अद्याप अजून तसे लेखी पत्र किंवा निवेदन माझ्याकडे आलेले नाही. लेखी निवेदन दिल्यावर ठरवता येईल.
-राजेश पाटील

Back to top button