पिंपरी : ड्रेसकोडच्या रंगसंगतीवरून नाराजी | पुढारी

पिंपरी : ड्रेसकोडच्या रंगसंगतीवरून नाराजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वर्ग 1 व वर्ग 2 च्या अधिकार्‍यांना गणवेश (ड्रेसकोड) बंधनकारक केला आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी येत्या 15 ऑगस्टपासून होणार आहे. निळ्या रंगातील गणवेशाचे नमुने पाहून अधिकारी खासगीत नाराजी व्यक्त करीत आहेत. गुजरात राज्यातील सुरत महापालिकेच्या धर्तीवर महापालिकेने वर्ग 1 व 2च्या अधिकार्‍यांना 15 ऑगस्टपासून गणवेश बंधनकारक केला आहे. वर्ग 1 च्या अधिकार्‍यांसाठी मायक्रोचेक्स ब्लू रंगाचा शर्ट व सफायर नेव्ही ब्लू रंगाची पँट आहे. महिला अधिकार्‍यांसाठी निळ्या व पिवळ्या रंगातील प्रिंटेड क्रेप कार्पोरेट साडी निश्चित केली आहे.

वर्ग दोनच्या अधिकार्‍यांसाठी पिन्स स्टाइप लाइट ब्लू रंगाचा शर्ट आणि सफायर नेव्ही ब्लू रंगाची पँट आणि महिला अधिकार्‍यांसाठी निळ्या रंगाची प्रिंटेड क्रेप कार्पोरेट साडी निश्चित केली आहे. या गणवेशाचे नमुने पालिका भवनातील कामगार कल्याण विभाग व कायदा विभागात पाहण्यासाठी उपलब्ध केले आहेत. ते नमुने पाहून काही अधिकार्‍यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली. निश्चित केलेल्या रंगसंगतीवर ते नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, गणेवशाचे कापड खरेदी व शिलाईचा खर्च अधिकार्‍यांना स्वत: करावा लागणार आहे. निश्चित केलेला गणेवश परिधान न केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.

Back to top button