पुणे : राज्यात पुणे, मुंबई शहर अपघात विमा काढण्यात आघाडीवर | पुढारी

पुणे : राज्यात पुणे, मुंबई शहर अपघात विमा काढण्यात आघाडीवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारतीय टपाल विभागाच्या वतीने नागरिकांच्या मदतीसाठी 399 रुपयांत सुरू केलेला अपघात विमा पॉलिसीचा लाभ राज्यातील सुमारे सहा कोटी नागरिकांनी घेतला आहे. अवघ्या दोन महिन्यांत अशा प्रकारची पॉलिसी काढण्याचा एक उच्चांक झाला आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी भारतीय टपाल विभागाने 399 रुपयांत दहा लाखांचा अपघात विमा ही पॉलिसी जुलै महिन्यात सुरू केली. 18 ते 65 वयोगटातील सर्व नागरिकांसाठी ही पॉलिसी खुली आहे.

कोणत्याही कागदत्रांशिवाय ऑनलाइन ही पॉलिसी काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. केवळ आधार कार्डचा नंबर माहीत असणे गरजेचे आहे. या पॉलिसीच्या नियमानुसार कोणत्याही रुग्णालयात नागरिकास उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. संबंधित पॉलिसीधारकाचा अपघात झाला (कोणत्याही प्रकारचा) अथवा त्यामध्ये मृत्यू तसेच कायमचे किंवा अंशत: अपंगत्व आल्यास त्यास दहा लाख रुपये मिळणार आहेत.

याबरोबरच मृत्युमुखी पडलेल्या विमाधारकाच्या दोन मुलांना शिक्षणासाठी प्रत्येकी एक लाख देण्यात येणार आहेत. अपघात झाल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यावर उपचारांसाठी लागलीच 60 हजार, उपचार सुरू असतानाच डिस्चार्ज घेऊन घरी गेल्यानंतर पुन्हा ओपीडीमध्ये डॉक्टरांना दाखविण्यास आले असता दिवसाला एक हजार रुपये मिळणार आहेत. विमाधारकाचा अपघात घरापासून दोनशे किलोमीटर अंतराच्या पुढे झाल्यास कुटुंबीयांना संबंधित रुग्णास भेटण्यास जाण्यासाठी 25 हजार रुपये तसेच मृत्युमुखी पडल्यास अंत्यविधीसाठी 5 हजार रुपयांची मदत मिळणार आहे.

याबाबत माहिती देताना टपाल विभागाच्या ग्रामीण भागाचे अवर अधीक्षक बी. पी. एरंडे म्हणाले, “ही विमा पॉलिसी सुरू करून केवळ एक महिनाच झाला आहे. मात्र, या एका महिन्याच्या कालावधीत राज्यातील सुमारे सहा कोटी नागरिकांनी ही पॉलिसी काढली आहे. राज्यात सर्वाधिक पॉलिसी पुणे आणि मुंबईतील नागरिकांनी काढली आहे.

 

Back to top button