पिंपरी : ’त्या’ निवृत्त पोलिसांवर उपासमारीची वेळ | पुढारी

पिंपरी : ’त्या’ निवृत्त पोलिसांवर उपासमारीची वेळ

संतोष शिंदे : 

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातून निवृत्त झालेल्या 46 पोलिसांना मागील चार महिन्यांपासून पेन्शन (निवृत्तिवेतन) मिळाली नाही. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याने काही निवृत्त पोलिसांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोलिस अधिकारी अथवा कर्मचारी पोलिस खात्यातून निवृत्त झाल्यानंतर त्यांना ठरविक दिवसात भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युएटी (सेवा निवृत्तीच्या वेळी मिळणारे पैसे) यासारखे लाभ मिळणे अपेक्षित असते.

तसेच, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी नियमित पेन्शन म्हणजेच निवृत्ती वेतन देखील सुरू होणे गरजेचे असते. मात्र, पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातून निवृत्त झालेल्या पोलिसांना हक्काचे पैसे मिळवण्यासाठी देखील उंबरे झिजवावे लागत असल्याचे चित्र आहे.
पोलिस आयुक्तालयातील मंत्रालयीन विभागात कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांच्या कामचुकारपणामुळे अशा प्रकारच्या अडचणी येत असल्याचे निवृत्त पोलिस सांगतात. तसेच, इतर ठिकाणी निवृत्तीपूर्वी संबंधित पोलिसांच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेतली जाते. त्यामुळे महासंचालक कार्यालय किंवा ट्रेझरीकडून त्रुटी काढल्या तरीही त्याची पूर्तता करण्यास वेळ मिळतो.

पुणे शहर येथून निवृत्त झालेल्या पोलिसांची पेन्शन वेळेत सुरु झाली आहे. मात्र, पिंपरी- चिंचवडमध्ये पोलिस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या मंत्रालयीन कर्मचार्‍यांना अनुभव नसल्याने वरिष्ठ कार्यालयातून सारख्या त्रुटी काढल्या जात असल्याचा आरोप निवृत्त पोलिसांकडून केला जात आहे.

निवृत्त पोलिसांच्या कागदपत्रांमध्ये ट्रेझरीकडून काही त्रुटी काढल्याने पेन्शन मिळण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे ट्रेझरी कार्यालयातील अधिकारी आणि निवृत्त कर्मचारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यावर तोडगा काढला जाणार आहे. येत्या काही दिवसांत पेन्शन सुरु होईल.
                              – सतीश माने, सहायक पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

Back to top button