पिंपरी : दुधाचे दर वाढल्याने चहा व्यावसायिकांची पंचाईत | पुढारी

पिंपरी : दुधाचे दर वाढल्याने चहा व्यावसायिकांची पंचाईत

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : बर्‍याच कुटुंबांतील प्रत्येक सदस्याच्या दिवसाची सुरुवात चहाने होते आणि दिवसभराची मरगळ देखील चहा घेऊनच झटकली जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात दुधाचे दर पुन्हा एकदा दोन रुपयांनी वाढले आहेत. परिणामी, तीन महिन्यांपूर्वीच चहामध्ये केलेली दरवाढ पुन्हा करावी की नाही, याचे कोड व्यावसायिकांना पडले आहे. सोमवारपासून दुधाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे. तीन महिन्यांपासून एकूण चार रुपयांनी दरवाढ झाली आहे.

जुलै महिन्यात पाऊस चांगला पडला असला तरी संपूर्ण जून महिन्यात पावसाने दांडी मारली होती. परिणामी गाई, म्हशींना आवश्यक चारा, वैरण आदी खाद्यांचे दर वाढल्याने दुधाच्या दरात वाढ केल्याची माहिती दुध विक्रेते देत आहेत. दुधाच्या दरात पुन्हा वाढ झाली मात्र याचा फ टका चहा व्यावसायिकांना बसल्याचे दिसून येते. शहरात जागोजागी चहाच्या टपर्या, हॉटेल सुरू आहेत. यामध्ये बरेच ब्रँडेड चहा विकणारेही व्यावसायिक आहेत. त्यामुळे शहरात व्यावसायिकांची स्पर्धा सगळीकडे दिसून येते. दर वाढविल्याने ग्राहक तुटणार किंवा शेजारच्या विक्रेत्यांकडे आपला ग्राहक जाणार की काय? याची भिती व्यावसायिकांना लागली आहे. मात्र दर वाढविले नाही, तर मिळणारा नफा कमी होईल. हे देखील तेवढेच सत्य आहे.

गेल्या तीन महिन्यांतील ही दुधाची दुसरी दरवाढ आहे. गॅसची देखील दरवाढ झाली मात्र आम्ही चहाचे दर वाढविले नाहीत. आजूबाजूला बरेच प्रतिस्पर्धी आहेत. आपण दर वाढविले तर ग्राहक वर्ग दुसरीकडे जाऊ शकतो. परंतु दिवसाला होणार्या धंद्यातून चहासाठी लागणारे साहित्य, दुकानाचे भाडे, आचार्याचे वेतन आदींचा खर्च भागविणे अवघड होऊन बसले आहे.
                                           – नीता आवटी, चहा व्यावसायिक, पिंपरी.

दुभत्या जनावरांसाठी आवश्यक वैरण, चारा, ढेप आदी खाद्यपदार्थांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. सोबतच गाई आणि म्हशींचे दरही वाढले आहेत. हा व्यवसाय करावा की, नको असाच प्रश्न पडत आहे. दुधामध्ये दरवाढ केल्याने थोडा आधार मिळाला आहे.
                                                 – विलास काजडे, दुध विक्रेता, निगडी

Back to top button