पिंपरी : सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांकडून बेड्या | पुढारी

पिंपरी : सराईत चोरट्याला हिंजवडी पोलिसांकडून बेड्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महिलांच्या गळ्यातील दागिने, मोबाईल हिसकावणार्‍या चोरट्याला हिंजवडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून सात मोबाईल आणि दोन मंगळसूत्र असा एकूण एक लाख 68 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
आकाश वजीर राठोड (22, रा. मुलखेड, ता. मुळशी) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राठोड सराईत गुन्हेगार असून तो हिंजवडी परिसरात महिलांचे दागिने हिसकावण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून राठोड याला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपीने हिंजवडी, वाकड आणि चिखली परिसरातून महिलांच्या गळ्यातील दागिने आणि मोबाईल चोरले असल्याचे सांगितले.

त्यानुसार, पोलिसांनी एक लाख 68 हजारांचे सात मोबाईल, दोन मंगळसूत्र जप्त केले. या कारवाईमुळे हिंजवडी पोलिस ठाण्यातील दोन, वाकड आणि चिखली पोलिस ठाण्यातील प्रत्येक एक असे चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलिस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहाय्यक निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, सहाय्यक उपनिरीक्षक बंडू मारणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Back to top button