पुणे : गणेगाव खालसा येथील पाण्याची चिंता होणार दूर | पुढारी

पुणे : गणेगाव खालसा येथील पाण्याची चिंता होणार दूर

रांजणगाव गणपती, पुढारी वृत्तसेवा : गणेगाव खालसा (ता. शिरूर) येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 4 कोटी 57 लाख 46 हजार रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे गणेगाव ग्रामस्थांची पाण्याची चिंता मिटणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य संतोष भोगवडे यांनी दिली.

जिल्हा परिषद पुणेच्या माध्यमातून रांजणगाव गणपती-कारेगाव जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची विकासकामे करण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर यांनी गणेगाव खालसा येेथील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. तसेच, पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांना देखील पत्रव्यवहार केला.

या अनुषंगाने जलजीवन मिशन योजनेंतर्गत 4 कोटी 57 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. गणेगाव खालसा गावठाण, पद्मावती वस्ती व इतर वाड्या-वस्त्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या यामुळे मिटणार आहे. स्वाती दत्तात्रय पाचुंदकर, शेखर पाचुंदकर यांच्या विशेष प्रयत्नांनी ही योजना मंजूर झाल्याने गणेगाव खालसा ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

 

Back to top button