पुणे : नळ पुन्हा जोडण्यास पैशांची मागणी | पुढारी

पुणे : नळ पुन्हा जोडण्यास पैशांची मागणी

दौंड, पुढारी वृत्तसेवा : दौंड शहरातील सहकार चौक ते रेल्वे पाण्याची टाकी या मार्गावर दौंड नगरपालिकेने नवीन पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले आहे. ते करताना पहिल्या जुन्या वाहिनीवरील जे पाण्याचे जोड ठेकेदाराने तोडले, ते
पुन्हा जोडण्यासाठी प्रतिजोडणी तीन हजार रुपयांची मागणी एक माजी नगरसेवक करीत असल्याने नागरिकांमध्ये मोठा असंतोष
पसरला आहे.

माजी नगरसेवक कोण आहे, हे येथील लोकांना चांगले माहिती असून, गुंडागर्दीमुळे नागरिक स्पष्टपणे बोलण्यास टाळतात व त्याची तक्रार देखील करीत नाहीत. दौंड नगरपालिकेतील अधिकारी व मुख्याधिकारी यांना देखील ही बाब सांगितली, तरी त्यांनी याकडे काणाडोळा केला आहे.येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी संपूर्ण अहवाल मागवून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिक करू लागले आहेत.

दौंड नगरपालिकेकडून अनेक ठिकाणी विविध कामे सर्रासपणे नियम धाब्यावर बसवून होत आहेत. नगरपालिकेचा एकही जबाबदार अधिकारी याकडे लक्ष का देत नाही, त्यांचे व या ठेकेदारांचे लागेबांधे आहेत का, असा सवाल जनता आता करू लागली आहे. याबाबत मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो झाला नाही.

Back to top button