पुणे : बारामतीतील बगिचा समस्यांचे आगार | पुढारी

पुणे : बारामतीतील बगिचा समस्यांचे आगार

बारामती, पुढारी वृत्तसेवा : बारामती नगरपालिकेअंतर्गत येणार्‍या गुल पूनावाला बागेत विविध समस्या जाणवत आहेत. बगिचासमोरच मातीचे ढीग, पार्किंगशिवाय अन्यत्र होणारे अस्ताव्यस्त पार्किंग, पावसाने उगवलेले गवत, मोकाट जनावरांचा वावर, अशा अनेक समस्यांनी बाग आनंदाची नव्हे, तर समस्यांचीच आगार बनली आहे.

तीन हत्ती चौक आणि रेल्वे ग्राउंडजवळ अशा दोन ठिकाणी बारामती पालिकेअंतर्गत उद्याने आहेत. मात्र, या उद्यानांमध्ये भरपूर समस्या असल्याची तक्रार बारामतीकर करीत आहेत. शहराच्या सौंदर्यात भर घालणार्‍या बागेची काळजी घेणे गरजेचे आहे. उद्यानातील समस्या दूर करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. बागेत वाहने पार्किंगची व्यवस्था असली, तरीही त्या ठिकाणी पालिकेच्या मालकीची वाहने अस्ताव्यस्त लागत असतात. याशिवाय समोरच मातीचे ढीग पडले आहेत. आत जातानाच पावसाचे पाणी साठलेले असते, त्यामुळे चिखलातून वाट काढूनच बागेत जावे लागते. दोन्हीही बागांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात गवत उगवले आहे. पंचायत समितीशेजारील बागेला चांगली सुरक्षा जाळी बसवली आहे. मात्र, अलिकडील बागेला सुरक्षा भिंत नसल्याने रखडलेल्या बाह्य मार्गाचा वापर करीत मोकाट जनावरे बागेत सहज प्रवास करतात.

बागेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्याने प्रेमीयुगुलांचे चाळे कमी झाले आहेत. सुरक्षा भिंतीचे काम अर्धवट राहिल्याने आणि या ठिकाणी लोखंडी गज उघडे पडल्याने लहान मुलांना अपघाताचा धोका संभवत आहे. पालकांनी लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. रेल्वेचा मालधक्का बागेशेजारीच असल्याने दिवसभर जड वाहनांची वाहतूक येथे सुरू असते, त्यामुळे बागेत आलेल्यांना शांतता लाभत नाही. पंचायत समितीशेजारील बागेसमोरच रेल्वेचे सिमेंटचे खांब पडलेले आहेत, ते हटविण्याची मागणी नागरिक करीत आहेत. याशिवाय दोन्हीही बागेत शौचालयाची सोय करणे गरजेचे आहे.

नागरिकांचा होतोय हिरमोड

वाढलेले गवत काढावे लागणार आहे. चारही बाजूंच्या परिसरात असलेला कचरा उचलून स्वच्छता करावी लागणार आहे. पावसामुळे गवत वाढल्याने या ठिकाणी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नगरपालिकेने येथील समस्या दूर कराव्यात, अशी मागणी बागेत वेळ घालविण्यासाठी येणार्‍या नागरिकांनी केली आहे. रविवारीच सर्वाधिक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. अनेक कुटुंबे सदस्यांसह फिरायला येत असतात. मात्र, बागांमधील समस्यांमुळे त्यांचा मोठ्या प्रमाणात हिरमोड होतो.

Back to top button