पुणे : गवारीला मिळतोय उच्चांकी भाव | पुढारी

पुणे : गवारीला मिळतोय उच्चांकी भाव

पारगाव, पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात सततच्या पावसाचा गवार पिकाला फटका बसला आहे. सध्या गवार पिकाला 10 किलोला तब्बल आठशे रुपये उच्चांकी बाजारभाव मिळत आहे. भाव जास्त मिळत असला, तरी उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरीवर्गात नाराजी दिसत आहे.

तालुक्याच्या पूर्व भागात शिंगवे, पारगाव ,रांजणी, वळती, नागापूर, काठापूर आदी परिसरातील शेतकर्‍यांनी गवार पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. गवार पिकाने शेतकर्‍यांना लाखो रुपये मिळवून देऊन चांगली साथ दिली आहे. सध्या गवार पिकाला दहा किलोला आठशे रुपये बाजारभाव मिळत आहे. हा बाजारभाव उच्चांकी आहे.

गवारीच्या पिकाला भांडवल कमी लागते. त्यामुळे शेतकरी गवार पीक मोठ्या प्रमाणात घेतात. शिंगवे येथील शेतकरी गणेश विठ्ठल वाव्हळ यांनी गवारीचे पीक घेतले आहे. त्यांना सुरुवातीपासूनच चांगल्या बाजारभावाची साथ मिळाली. सुरुवातीला पावसाअगोदर गवारीला चारशे रुपये दहा किलोला बाजारभाव मिळाला. त्यानंतर बाजारभावात सातत्याने वाढ होत गेली. आता आठशे रुपये बाजारभाव मिळत आहे.

गवारीच्या पिकाला सततच्या पावसाचा फटका बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. शेंगा तोडणीला उशिराने येत आहेत. बाजारभाव वाढीचा फायदा शेतकर्‍यांना होत नसल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Back to top button