पुणे : बेल्हे परिसर हिरवाईने नटला | पुढारी

पुणे : बेल्हे परिसर हिरवाईने नटला

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा : यंदा खरीप हंगामात दमदार पाऊस बरसल्याने बेल्हे परिसरातील आळे, राजुरी, बांगरवाडी, आणे, नळावणे डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू लागला आहे.

कळमजाई देवी डोंगर, आळे खिंड, खबडी, बांगरवाडी आदी डोंगरमाथ्यांची लांबी 17 ते 18 किलोमीटर इतकी आहे. डोंगरमाथा व परिसरात जैविक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस होतो. त्यामुळे डोंगरमाथ्यावर फारसे नैसर्गिक सौंदर्य फुलत नव्हते. यंदा हंगामाच्या मध्यवर्तीला जोरदार पाऊस झाला, त्यामुळे हा डोंगरमाथा हिरवाईने नटला. मात्र, भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी परिसरात अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.

परिसराला पौराणिक महत्त्वही आहे. विविधतेने नटलेल्या डोंगरातील झाडे, वेलीवर पशुपक्ष्यांची किलबिल वाढली आहे. नळावणे परिसरात जंगली श्वापदे, मोर, ससा, हरीण, काळवीट, साळिंदर, लांडगे, जंगली डुकरे दिसत आहेत. डोंगररांगेत हिरडा, बेहडा,अर्जुन, सौताडा, गुळवेल आदी वनौषधींचा खजिना आहे, त्यामुळे तेथे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळू शकते.

सकाळच्या वेळी महाबळेश्वरचाच अनुभव

कळमजाई व गुुुळूंचवाडी, नळावणे कुलस्वामी डोंगर वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे सकाळी सहा वाजता गेले, तर ढगांचा स्पर्श, थंडगार हवा असा थेट महाबळेश्वरचाच अनुभव अनुभवायास मिळतो. गुुुळूंचवाडी परिसरातील डोंगर परिसर नुकत्याच पडलेल्या पावसाने फुलला आहे.

Back to top button