भिगवण, पुढारी वृत्तसेवा : ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहित्याची चोरी केल्याचा राग मनात धरून उत्तर प्रदेश येथील इसमाला बेदम मारहाण करून त्याचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भिगवण पोलिसांनी देहूगावच्या तरुण शेतकऱ्याला अटक केली. विशेष म्हणजे या प्रकरणात अपघाताचा बनाव वाटला होता; मात्र 'पोलिस के हात लंबे होते है' याचा प्रत्यय भिगवण पोलिसांनी दाखवत येथे सापडलेल्या अनोळखी इसमाच्या खुनाला वाचा फोडली.
आकाश वामन काळोखे (वय २३, रा. देहूगाव विठ्ठलवाडी, ता. हवेली) यास अटक करण्यात आली आहे. अरुण सिंह (वय ५३, रा. बब्बनसिंह, गाव भेदौरा आजमगढ, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी माहिती दिली की, दि. ८ जुलै रोजी भिगवण पोलीस ठाणे हद्दीत पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पोंधवडी गावच्या हद्दीत बंडगरवाडीजवळ सेवा रस्त्याच्या कडेला एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची खबर पोलीस पाटील शामला पवार यांनी दिली होती. सुरवातीला हा प्रकार म्हणजे रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी पादचारी मयत झाला असावा, अशी शक्यता वाटली होती; मात्र सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या चाणाक्ष नजरेतून यामागे काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय आला व याची खातरजमा करण्यासाठी एक पथक नेमले.
तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती व गुप्त बातमीदाराच्या आधारे अखेर देहुगावपर्यंत याचे धागेदोरे हाती आले आणि संशयित म्हणून आकाश काळोखे यास ताब्यात घेऊन चौकशी करता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तर दिले. परंतु पोलीसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्यानुसार दि. ७ जुलै रोजी आकाशच्या देहुगाव विठ्ठलवाडी येथे मालकीचा ट्रॅक्टर (एमएच १४ जीवाय ५४२९) च्या ट्रॉलीची लोखंडी प्लेट अरुण सिंह चोरून जात असताना आकाशने त्याला पकडले व हाताने, लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून लोखंडी टॉमी कपाळावर, डोक्यात मारून त्याचा खून केला.
यानंतर परिसरात या मृताची ओळख पटू नये म्हणून स्वतःच्या वेरना गाडी (एमएच १४ डीएन ८७९७) मध्ये हा मृतदेह दिवसभर ठेवला व दि. ८ जुलै रोजी दहा वाजेच्या सुमारास वेरना गाडीतून मृतदह घेऊन १५० किलोमीटरचा प्रवास करून गाडी इंदापूर तालुक्यात पोचली. भिगवणजवळ पोंधवडी हद्दीत सेवा रस्त्याच्या कडेला हा मृतदेह टाकण्यात आला, याची कबुली आकाशने दिली आहे. यावरून आकाश काळोखे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक सुभाष रुपनवर, तसेच सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हासिम मुलाणी, अक्षय कुंभार, गणेश पालसांडे या पथकाने या खूनाचा छडा लावला.