पुणे : शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा मार्ग मोकळा | पुढारी

पुणे : शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा मार्ग मोकळा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ देण्याचा शासन निर्णय जाहीर झाल्याने शेतकर्‍यांना हा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नियमित कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे शासनाच्या आदेशात नमूद केले आहे.

राज्यात एकूण 1 कोटी 53 लाख शेतकरी असून शेती व शेतीशी निगडित कामांकरिता व्यापारी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून कर्ज घेतात. अल्पमुदत पीक कर्ज 2017-18, 2018-19 व 2019-20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक यापैकी जी नंतरची असेल, त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्णतः परतफेड (मुद्दल अधिक व्याज) केली असल्यास अशा शेतकर्‍यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास दिनांक 27 जुलै 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मात्र, सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये 50 हजारांपेक्षा कमी असल्यास, अशा शेतकर्‍यांना त्यांनी सन 2018-19 अथवा सन 2019-20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात येत आहे. प्रोत्साहनपर लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक अथवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन रुपये 50 हजार या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ रक्कम निश्चित करण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी यापूर्वीच्या कर्जमाफी योजनेप्रमाणेच ऑनलाईन पद्धतीने करण्यात येईल, असा योजनेचा तपशील आहे.

Back to top button