जुन्नरमधील बुद्धलेण्या घालताहेत पर्यटकांना साद | पुढारी

जुन्नरमधील बुद्धलेण्या घालताहेत पर्यटकांना साद

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा: जुन्नर तालुक्यातील बुद्धसंस्कृतीचा वारसा असणार्‍या प्राचीन बुद्ध लेण्या देखील खुलून गेल्या आहेत. या लेण्या देशभरातील अभ्यासक व देशी, विदेशी पर्यटकांना साद घालू लागल्या आहेत. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेला जुन्नर तालुका पावसामुळे अधिकच खुलून गेला आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, घाटवाटा, देवराया, जंगले हिरवीगार झाली आहेत. निसर्गासह धबधब्यांमध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जुन्नर तालुक्यात येऊ लागले आहेत. धुक्यात हरवलेली वाट, अंगाला झोंबणारा गार वारा, पावसाच्या चाललेल्या श्रावण सरी, डोंगरावर रुतून बसलेले मोठमोठे काळे खडक, काही ठिकाणी उंच शिळांवरून पडणार्‍या पाण्यामुळे निर्माण झालेले धबधबे, त्याच्या बाजूने अनेक वर्षांपासून उभ्या असलेल्या बुद्ध लेण्या. निसर्गाचा हा अलौकिक नजारा सध्या जुन्नर तालुक्यात दिसून येत आहे.

जुन्नर तालुक्यात सुमारे तीनशेहून अधिक लेण्या आहेत. बुद्धसंस्कृतीमध्ये चातुर्मासाला अधिक महत्त्व आहे. यामध्ये आषाढी पौर्णिमेपासून ते अश्विन पौर्णिमेपर्यंत वर्षावासाचा कालावधी असतो. आषाढी पौर्णिमेपासून वर्षावासाला प्रारंभ होतो. नंतरचा एक महिना हा वर्षावास समाप्तीचा असतो. पावसाळ्यात चार महिन्यांमध्ये एकाच विहारात अथवा राहण्यायोग्य परिसरात एकाच ठिकाणी उपसंपदा झालेल्या भिक्खूंनी वास्तव्य करण्याला वर्षावास म्हणतात. वर्षावासाची सुरुवात स्वतः भगवान बुद्धांनी केली असून, आजही ही परंपरा अखंडपणे चालू आहे. वर्षावासाच्या या पोषक व प्रसन्न वातावरणात बुद्ध धम्म व संघाला वंदन करून शीलपालन, सूत्रपठण व ध्यानभावनेचा अभ्यास केल्यास भावनामयी प्रज्ञेचा विकास होतो. त्यामुळेच भगवान बुद्धांनी वर्षावासाला असाधारण महत्त्व दिले आहे.

Back to top button