पुणे : लोकशाहिराला ‘भारतरत्न’ द्या; भगवान वैराट यांची मागणी | पुढारी

 पुणे : लोकशाहिराला ‘भारतरत्न’ द्या; भगवान वैराट यांची मागणी

 पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘केवळ दीड दिवसाची शाळा शिकून अण्णा भाऊ साठे यांनी उच्च दर्जाची साहित्य निर्मिती केली. असे असूनही अण्णा भाऊंची उपेक्षा होत आहे. त्यांना तातडीने भारतरत्न हा पुरस्कार जाहीर करावा,’ अशी मागणी महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक-अध्यक्ष भगवान वैराट यांनी केली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, या मागणीसाठी अण्णा भाऊंचे जन्मगाव असलेल्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावपासून पुण्यातील सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत क्रांतिज्योत काढण्यात आली होती.

या वेळी लेखिका अनघा भट, ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, शहराध्यक्ष चंद्रशेखर पिंगळे, पुणे जिल्हा शहर मातंग समितीचे स्वागताध्यक्ष शंकर शेडगे, सचिव विकास सातारकर, महम्मद शेख, शिवाजी भिसे, जलसा वैराट, राजू वेळणूर, सुनीता जाधव, राजाभाऊ शिंदे, रोहित वैराट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘आज केवळ भारतातच नव्हे, तर पाश्चात्य देशांमध्येदेखील त्यांचे साहित्य आणि व्यक्तिमत्त्वावर डॉक्टरेट केली जात आहे, ’ असे वैराट यांनी म्हटले आहे. सोनग्रा म्हणाले, ‘महानगरातील आधुनिक प्रश्न, झोपडपट्टीवासीयांचे जीवन साहित्यात प्रखरपणे अण्णा भाऊ साठे यांनी त्याकाळी मांडले.

साहित्याने माणूस समृद्ध होतो. आज माणूस जात आणि धर्मामध्ये विभागला जात आहे. अशा परिस्थितीत आण्णा भाऊ साठे यांचे विचार प्रेरणादायी आहेत.’ भट म्हणाल्या, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अण्णा भाऊ साठेंची लेखणी आणि शाहिरी गर्जत होती. लोकजागृती हेच त्यांच्या साहित्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याने आपल्या सर्व प्रकारच्या साहित्यातून त्यांनी वंचित आणि पीडितांच्या दुःखाला वाचा फोडली. त्यांचा भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरव केला गेला पाहिजे.’

Back to top button