पुणे : 35 बाईक टॅक्सींना दणका | पुढारी

पुणे : 35 बाईक टॅक्सींना दणका

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दुचाकीच्या माध्यमातून अनधिकृतरित्या प्रवासी वाहतूक करणार्‍या 35 बाईक टॅक्सी सोमवारी ‘आरटीओ’कडून जप्त करण्यात आल्या. ही मोहीम आणखी सुरू राहणार असल्याचे ‘आरटीओ’कडून सांगण्यात आले आहे. रॅपिडो, ओला अ‍ॅपच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना बाईक टॅक्सीची सुविधा पुरविली जात आहे. ही सुविधा मोटार वाहन कायद्यानुसार अनधिकृत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचविणारी आहे.

त्यामुळे आरटीओकडून सोमवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले, मोटार वाहन निरीक्षक संतोष झगडे यांच्या पथकाने केली. त्याद्वारे एका दिवसात 35 अनधिकृत बाईक टॅक्सी जप्त केल्या आहेत. या सर्व गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

बाईक टॅक्सी अजूनही सुरूच
आरटीओने यापूर्वी अनधिकृतरित्या प्रवासी वाहतूक करणार्‍या 400 बाईक टॅक्सी जप्त केल्या होत्या. त्या वेळी अ‍ॅप कंपन्या स्वत:च कोर्टात गेल्या. त्या वेळी कंपन्यांनी उच्च न्यायालयात आम्ही महाराष्ट्रात हा व्यवसाय करणार नसल्याचे म्हटले; परंतु तरीही त्यांनी त्यांचे अ‍ॅप अद्याप बंद केलेले नाही. त्यामुळे शहरातील तरुणाई या अ‍ॅपच्या माध्यमातून अनधिकृतरित्या व्यवसाय करत असल्याचे दिसून आले आहे.

Back to top button